Breaking News

अत्यावश्यक सेवे अंतर्गत जेएनपीटीचे कार्य अविरतपणे चालू; सलग दुसर्‍या वर्षी 5 दशलक्ष टीईयू मालाची हाताळणी

उरण : वार्ताहर

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारतातील एक प्रमुख बंदर आहे. जेएनपीटीने आर्थिक वर्ष 2020 मध्ये आपली उत्कृष्ठ कामगिरी कायम ठेवत 5 मिलियन टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) कंटेनरची हाताळणी केली आहे व कोविड -19 च्या उद्रेकाच्या परिणामावर मात करत सलग दोन वर्षे (मागील वर्षी 5.13 मिलियन टीईयू) अशी कामगिरी करणारे जेएनपीटी हे भारतातील पहिले बंदर ठरले आहे. मागील वर्षाच्या 70.71 मिलियन टनाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात 68.45 मिलियन टन वाहतुकीची हाताळणी केली आहे.

टर्मिनलनिहाय आकडेवारीचा विचार करता पीएसएचे नवीन कंटेनर टर्मिनल जेएनपीटी-बीएमसीटी ने मागील वर्षाच्या तुलनेत 55.51% आणि एनएसआयजीटीने 4.11% वाढ नोंदविली आहे. आर्थिक वर्ष 2020मध्ये एपीएम टर्मिनल मुंबईने (जीटीआय) वर्षभरात 1.99 मिलियन टन टीईयू, एनएसआयजीटी ने 0.99 मिलियन टीईयू, पीएसए बीएमसीटी ने 0.8 मिलियन टीईयू, जेएनपीसीटीने 0.72 मिलियन टीईयू आणि एनएसआयसीटीने 0.33 मिलियन टीईयू ची हाताळणी केली.

जेएनपीटीने वर्षभरात 1.02 मिलियन टन सिमेंटची हाताळणी केली असून, दहा वर्षानंतर 1 दशलक्ष टनांचा  टप्पा ओलांडला आहे व  एकूण 6.45 मिलियन टन लिक्विड कार्गोची हाताळणी केली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 35% जास्त ब्रेक बल्कची हाताळणी केली आहे.

या कामगिरीबद्दल बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भाप्रसे म्हणाले की, सलग दोन वर्षे 5 मिलियन टीईयूचा टप्पा ओलांडणे हे आमच्या प्रयत्नांचा व आम्ही जेएनपीटीत देत असलेल्या सेवेच्या  दर्जाचा परिणाम आहे. आमच्या टीमची गेल्या काही महिन्यांतील कामाप्रतीची निष्ठा व्यापारास निरंतर सेवा देण्यासाठीची आमची वचनबद्धता दर्शविते. याशिवाय आमच्या सर्व भागधारकांच्या पाठिंब्या मुळेसुद्धा आम्ही जेएनपीटीमध्ये कामाचा वेग कायम ठेवू शकलो आहे.

कोविड-19 या साथीच्या आजारामुळे सरकारला लोकांच्या हालचाली रोखाव्या लागल्या आहेत. परंतु देशामध्ये पुरवठा साखळी (सप्लाय चेन) चालू ठेवण्यासाठी बंदर क्षेत्र हे अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले गेले आहे. या दरम्यान जेएनपीटी ने विनाव्यत्यय व्यापार चालू ठेवण्यासाठी व कोविड-19 च्या उद्रेकाचा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी काही उपाय केले आहेत. जेएनपीटीने आपले मनुष्यबळ सुसज्ज आणि संरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय देखील केले आहेत. आम्ही जेएनपीटी कंटेनर टर्मिनल येथे काही उपाय केले आहेत व आमच्या ग्राहकांना समर्थन / मदत करण्याच्या उद्देशाने व्यापारास काही सवलती देखील दिल्या आहेत. दि. 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत रस्तेमार्गे वाहतूक केली जाणार्‍या सर्व आयात कंट ेनर (सीएफएस/डीपीडी/रिक्त) साठी ड्वेल टाइम शुल्क आकारले जाणार नाही; दि. 31 मार्च 2020 पर्यंत सीएफएस / डीपीडी कंटेनरची रेलमार्गाने वाहतूक सुलभ करण्यासाठी वाहतूक पर्यायामध्ये बदल केलेल्या (ट्रक ते रेल्वे) आयात कंटेनरसाठी कोणतेही शिफ्टिंग शुल्क आकारले जाणार नाही; दि. 31 मार्च 2020 पर्यंत 48 तासानंतर टर्मिनलमधून डीपीडी कंटेनर वितरणास परवानगी दिली आहे.

सरकारच्या निर्देशानुसार, जेएनपीटी तसेच जेएनसीएच, जीटीआय, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, बीएमसीटीपीएल, शिपिंग लाईन्स, कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस), कस्टम हाऊस एजंट्स (सीएचए), वाहतूकदार, कॉनकोर, खाजगी कंटेनर ट्रेन ऑपरेटर, ट्रक वाहतूकदार, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टी व संबंधित टँक फार्म, रिकामे यार्ड ऑपरेटर, फसाई सारख्या भागीदार सरकारी एजन्सीज, पोर्ट ऑपरेशन्सशी संबंधित क्वारेन्टाईन प्लांट सारख्या अन्य एजेंसीचे कार्य चालू राहील व या कठीण परिस्थितीत  पोर्टला आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपले कार्य निर्धारित कार्यक्रमानुसार चालू ठेवून सहकार्य करती आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply