नागपूर ः प्रतिनिधी
शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी मुंबईत झाला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. ते शनिवारी (दि. 16) नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. फडणवीस म्हणाले, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे, असे सांगितले. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले. काहीही झाले तरी डॉ. आंबेडकरांचे संविधान बदलले जाणार नाही. ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही. पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले, तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपला नाकारले. तर तसे नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले आणि तुम्हाला वरपास केले. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारून सांगावे की, त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आले असते. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावे लागले, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहील!
उद्धव ठाकरेंवर चौफेर हल्ला चढवताना फडणवीसांनी म्हटले की, मुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय. म्हणजे नक्की काय करायचेय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील!
बाळासाहेब ठाकरेंचे भाषण खरी पर्वणी, आता सगळेच अळणी!; मनसेचा टोला
मुंबई ः दसर्या मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे भाषण म्हणजे खरी पर्वणी असायची. आता मात्र सगळेच अळणी, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. देशपांडे म्हणाले, मी लहानपणापासून दादरला राहतो. दसरा मेळावा हा शिवतीर्थवर व्हायचा त्या वेळी आम्ही सर्व जण सन्माननीय हृदयसम्राट बाळासाहेबांचे भाषण ऐकायला जायचो. खरेच ती एक पर्वणी होती. नवीन विचार मिळायचा, नवीन दिशा महाराष्ट्राला मिळायची. आता मात्र सगळेच अळणी झालेले आहे. मीठ नसलेल्या जेवणासारखे यंदाच्या दसरा मेळाव्यातील भाषण होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीचा आता लोकांनाही कंटाळा वाटायला लागलेला आहे. हे म्हणजे गरम पाण्याच्या नावाखाली नुसतेच कोमट पाणी आहे. मला काय ते हिंदू आणि नवे हिंदूत्वाबद्दल कळत नाही, पण ही नवीन शिवसेना असून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.