चिरनेर महामार्गावर उड्डाणपूल उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हिरवा कंदील
उरण : प्रतिनिधी
उरण-पनवेल महामार्गावर गव्हाणफाटा हे वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले असून, नागरिकांसह वाहनचालक व येथील व्यवसायिक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे आत्ता या वाहतूक कोंडीवर उड्डाणपुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. त्यामुळे चिरनेर परिसराकडे जाणार्या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला असल्याने गव्हाणफाटा येथील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे.
गव्हाण फाट्यावर पनवेल ते चिरनेर महामार्गाला जोडणारा उड्डाणपुल लवकरच उभारला जाणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. या पुलाच्या उभारणीनंतर उरण-पनवेल महामार्गावरील गव्हाणफाटा येथील वाहतूक कोंडी दूर होणार असून, सिग्नलवरही थांबावे लागणार नाही.
उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदर तसेच त्यावर आधारित उद्योगांमुळे उरण, पनवेल महामार्गावरील वाहनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल तसेच उरण परिसराला जोडणारा मुख्य मार्ग असलेल्या गव्हाणफाटा वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले आहे. येथे अनेकदा दोन ते तीन तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हजारो कोटी रुपये खर्च करून जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पनवेलला जोडणार्या सहा व आठ पदरी महामार्गाचे काम 2014 पासून सुरू आहे.
या महामार्गावर सर्वांत अधिक उड्डाणपूल हे गव्हाणफाटा येथे उभारले जात आहेत. या उड्डाणपुलांची कामे सुरू असून याच मार्गावर आणखी चिरनेर मार्गाकडे जाणार्या एका उड्डाण पुलाची भर पडणार आहे. त्यामुळे या मार्गावर कोणत्याही प्रकारची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित राहणार नसून त्याकरिता आवश्यक असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाचे संचालक प्रशांत फेगडे यांनी दिली आहे.