सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांचा दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.
सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर आक्रमक शैलीत टीकेचे बाण सोडले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही शिवसेनेबरोबर सत्तेत आहेत ना, तर मग शिवसेनेवर कशाला अन्याय करता? आम्हांला सत्तेत बसायची सवयच नाही. शिवसेना तर विस्थापितांचा गट आहे. तसे कोणी अजमावून पाहू नये. सरकारच्या अर्थसंपल्पातदेखील शिवसेनेला दुय्यम-तिय्यम स्थान मिळते. अर्थसंकल्पात 60-65 टक्के निधी राष्ट्रवादीला तर 30-35 टक्के निधी काँग्रेसला मिळतो. फक्त 16 टक्के एवढाच निधी शिवसेनेला मिळतो. त्यातही उच्च व तंत्रशिक्षण खाते शिवसेनेकडे असल्यामुळे दहा टक्के निधी वेतनातच खर्च होतो. केवळ सहा टक्केच निधी विकास कामांसाठी शिवसेनेच्या वाट्याला येतो. राष्ट्रवादीचा सामान्य ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील सरकारकडून एकेक कोटीचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर बसून नाचतो, आम्ही शिवसैनिकांनी शिवभोजन थाळीवरच समाधान मानायचे. त्यातही पुन्हा बिले मिळण्यासाठी सहा सहा महिने वाट पाहायची, अशा शब्दांत सावंत यांनी खदखद जाहीरपणे प्रकट केली.
ते म्हणाले, महाविकास आघाडीत एकत्रपणे मांडीला मांडी लावून बसतात आघाडी धर्म पाळायच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात. मात्र दुसरीकडे शिवसेनेची मुस्कटदाबी केली जाते. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आमच्या नादी लागू नये. तुम्ही आम्हाला शंभर मारले आणि मग आमचा एकच दणकट मार बसला की तुम्हांला आईचे दूध आठवेल, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद संपविण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेसकडून होत आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे यापूर्वी जेथून दोनवेळा निवडून गेले होते, त्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी क्षीरसागर यांना संधी मिळायला हवी होती. परंतु त्यांना डावलण्यात आले आहे. उस्मानाबादमध्ये शिवसेनेने यापूर्वी दोन्ही काँग्रेसची ताकद संपवून पाच-सहा आमदार निवडून आणले होते. आता त्याच उस्मानाबादमध्ये आघाडी असूनही दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. अशी अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत, अशा शब्दांत सावंत यांनी आपली अस्वस्थता बोलून दाखविली.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …