ढाका : वृत्तसंस्था
30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपसाठी आता प्रत्येक क्रिकेट बोर्ड स्वतःच्या टीमची घोषणा करत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बांगलादेशचा फास्ट बॉलर तसकीन अहमद ढसाढसा रडला आहे. मीडियाशी बोलताना तसकीन अहमदला अश्रू अनावर झाले.
वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्यामुळे खेळाडूच्या रडण्याची बांगलादेश क्रिकेटमधील ही दुसरी घटना आहे. याआधी 2015 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे बांगलादेशचा क्रिकेटपटू मशर्फे मुर्तजालाही रडू कोसळलं होतं, पण आज कठोर मेहनतीमुळे मुर्तजाची वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
तसकीन अहमदने बांगलादेशकडून 32 वनडे मॅचमध्ये 5.95 च्या सरासरीने 45 विकेट घेतल्या आहेत. तसकीन अहमदने एक वेळा इनिंगमध्ये 5 विकेटही घेतल्या आहेत. ऑक्टोबर 2017 पासून टीममधून बाहेर असलेल्या तसकीन अहमदला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे बांगलादेश बोर्डाने तसकीनची निवड केली नाही, एका मॅचदरम्यान कॅच पकडताना तसकीनला दुखापत झाली. बांगलादेशच्या वर्ल्ड कप टीममध्ये तसकीनऐवजी अबू जायेद याची निवड झाली आहे. अबू जायेदनं आतापर्यंत बांगलादेशकडून एकही वनडे मॅच खेळली नाही. अबू जायेदनं बीपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. अबू जायेद बांगलादेशकडून टी-20 आणि टेस्ट मॅच खेळला आहे.