Breaking News

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे योग्य नाही!; परीक्षांच्या गोंधळावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

नगर ः प्रतिनिधी

आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा गोंधळावर संताप व्यक्त करीत आपल्याच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 24 ऑक्टोबरला होणार्‍या आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्यातील आणि दुसर्‍या सत्रातील परीक्षेसाठी दुसर्‍या जिल्ह्यातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्विट करीत परीक्षा घेणार्‍या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात हे योग्य नाही, असे म्हटले आहे, तसेच येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससीमार्फतच घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून गट क आणि गट ड मधील पदांची भरती प्रक्रिया खाजगी कंपन्यांद्वारे राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी निवडलेली ‘न्यासा’ कंपनी काळ्या यादीतील असल्याचा आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते, मात्र त्या वेळी परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्रांबाबत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली होती. यानंतरही गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply