सोलापूर ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही दरोडेखोरी असल्याची टीका भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भातील कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय आणि सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते रविवारी (दि. 17) सोलापूरच्या दौर्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करीत राष्ट्रवादी आणि पवार परिवाराला लक्ष्य केले. या वेळी त्यांनी शरद पवार यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बेनामी मालमत्तेत त्यांच्या बहिणी व मेव्हण्यांचा हिस्सा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या विविध नेत्यांवर गैरकारभाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून याबद्दल मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल, असे आव्हान त्यांनी दिले.महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते सीबीआयवर आगपाखड करीत आहेत, मात्र त्यानंतरही या यंत्रणांची कारवाई सुरूच राहणार आहे, असे सोमय्या म्हणाले. सोलापूर दौर्यात सोमय्या यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवादही साधला.
जनतेने जायचे कुठे?
राज्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून होणारे घोटाळे, भ्रष्टाचार पोलिसांनी उघड करायला हवा, मात्र हे सरकार पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून काम करीत आहेत. पोलीस खातेच चोरी करतेय, पोलीसच सुपारी घेताहेत, पोलीस आयुक्तच गायब होतो, गृहमंत्री फरारी होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचे कुठे? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकायुक्त, राष्ट्रीय हरित लवाद, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट सोमय्या जात आहे, तर त्यात चूक काय, असे या वेळी त्यांनी नमूद केले.