उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन; विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ माणगावमध्ये जाहीर सभा
माणगाव : प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी (दि. 12) संध्याकाळी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे येथे केले. विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी शनिवारी संध्याकाळी पेण तर्फे तळे येथे जाहीर सभा घेण्यात आली. त्यात सुभाष देसाई बोलत होते. माणगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. मागील सत्ताधार्यांना माणगावचा विकास करता आला नाही. शहर विकासासाठी आपण श्रीवर्धन परिसरात एमआयडीसी उभारून सुशिक्षित बेरोजगारांसह तरुणांना रोजगार, उद्योगधंदे उपलब्ध करून देणार असून, आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करू. तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयात पोहचण्यासाठी 2500 विद्यार्थी बसेस उपलब्ध करून देणार. जिल्ह्यात सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभे करू व मुख्यमंत्री आवास योजनांमधून प्रत्येकाला स्वत:चे घर उपलब्ध करून देत आपण स्वत: श्रीवर्धनसह माणगावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे विकासाची जबाबदारी मी घेतो, परंतु विनोद घोसाळकर यांनाच बहुमताने विजयी करा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी या वेळी केले. भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराच्या या लढतीत खोटी पत्रके दाखवून जनतेची दिशाभूल करणार्या आणि जनतेला लाचार बनवू पाहणार्या सुनील तटकरे यांना राजकारणातून कायमचे घरी बसवा आणि नव्या दमाच्या, विकासाचे व्हिजन असणार्या विनोद घोसाळकर यांनाच विजयी करा व शिवरायांचा भगवा पुन्हा एकदा श्रीवर्धनवर फडकवत वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी या वेळी केले. महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचेही या वेळी समयोचित भाषण झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, जिल्हा परिषद सदस्या स्वाती नवगणे यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या वेळी उपस्थित होते.