आबुधाबी ः वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंकेने नामिबीयाचा सात गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. नामिबीयाने श्रीलंकेला विजयासाठी 97 धावांचे आव्हान दिले होतं. हे आव्हान श्रीलंकेने 13 षटके आणि तीन चेंडूंत तीन गडी गमवून पूर्ण केलं. नामिबीयाने विजयासाठी दिलेल्या 97 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. संघाच्या 14 धावा असताना कुसल परेला बाद झाला. रुबेन ट्रम्पेलमनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर निसांकाही माघारी परतला. बर्नाड स्कोल्ट्झच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या 26 असताना दिनेश चंडिमल बाद झाला. मग चौथ्या गड्यासाठी अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्सा यांनी चांगली भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. अविष्काने 28 चेंडूंत 30, तर भानुकाने 27 चेंडूंत 42 धावांची खेळी केली. तत्पूर्वी नामिबीयाच्या खेळाडूंमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्ट दिसली. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. टप्प्याटप्प्याने फलंदाज तंबूत परतत राहिले आणि त्यांनी श्रीलंकेला विजयासाठी 97 धावा दिल्या.