महाड : प्रतिनिधी
सावित्री नदीच्या पुराचे पाणी सातत्याने येणार्या महाड परिसरातील भागात इमारत बांधकाम परवानगी देताना फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी महाड पत्रकार संघाने रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात महाड शहर तसेच दादली, किंजळघर, शिरगाव, राजेवाडी, नडगाव बिरवाडी, ईसाने कांबळे, आसनपोई, आकले, वडवली, लाडवली, तेटघर करंजखोल या गावात सावित्री नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पुर्वी पुराचे पाणी पसरत असे व लागलीच त्याचा निचरा होत असे. या परिसरात अकृषिक परवानगी देतानाच बांधकामांना परवानगी देण्यात येतात. शिवाय नगरपालिका क्षेत्रातील काकरतळे,नवेनगर, पंचशीलनगर, दस्तुरीनाका, नातेखिंड, लाडवली, भीमनगर, साहिलनगर, आदी भागांमध्ये सातत्याने पूर येणार्या क्षेत्रात अलिकडे पूर नियंत्रण रेषेच्या नियमावलीचा भंग करून मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा त्वरित होताना दिसत नाही. त्याचा फटका यंदा महाड व परिसरातील नागरिकांना बसला. जलसंपदा विभागाने सावित्री खाडीमध्ये पूर नियंत्रण रेषेची आखणी केली आहे. मात्र स्थानिक यंत्रणेने बांधकामांना परवानगी देताना या पूर रेषेचा गांभीर्याने विचार केला नाही. त्याचा फटका 22 जुलै रोजी आलेल्या पुरामुळे बसला. त्यानंतरही नदी पात्रात, शेजारी मोठ्या प्रमाणावर बांधकामे जोमाने सुरू आहेत. पूरनियंत्रण रेषेच्या नियमावलीचा भंग करून झालेल्या बांधकामाबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा व यापुढे पूर नियंत्रण रेषा संदर्भातील जी बांधकामे होणार आहेत त्यांना कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. महाड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, सदस्य मिलिंद माने, उदय सावंत यांनी निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.