सचिन तेंडुलकरच्या भावना
मुंबई : प्रतिनिधी
‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसर्या पुरस्काराशी तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक याचे माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर आहे. 24 वर्षे क्रिकेट खेळून झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) मला त्याची पावती या सन्मानाच्या रूपाने मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत सचिनने प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘तुमच्या कार्याची दखल घेतली जाणे हेच खूप महत्त्वाचे आहे. समजा की तुम्ही अगदी लहान आहात आणि तेव्हादेखील तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या कामाची दखल घेतली जात असेल, तर ते विशेष आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपले आदर्श बदलत असतात. हा प्रवास करताना तुम्ही चांगले काम केलेत आणि तुमच्या कामाची दखल घेतली गेली, तर ते अधिक महत्त्वाचे आहे’, असे सचिन पुढे म्हणाला.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने, कसोटी क्रिकेटमध्ये 15 हजारांहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 हजारांहून अधिक धावांबरोबरच इतरही अनेक विक्रम केले आहेत.