Breaking News

सुरक्षा रक्षकांना न्याय द्या!; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना तात्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कोळी संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. रायगड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जिल्ह्यातील तीन हजार 200 तरुणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड करण्यात आली होती, मात्र जवळपास दीड वर्षानंतरही यातील बहुतांश जणांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षक पदासाठी निवड होऊनही हे सर्व जण रोजगारापासून वंचित राहिले आहेत. या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करूनही त्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. शासकीय, निमशासकीय आणि मंडळाकडे असणार्‍या नोंदणीकृत आस्थापनांकडे जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन या सुरक्षा रक्षकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. या उलट खाजगी सुरक्षा रक्षकांची काही ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीत सुमारे 400 खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, तर जेएसडब्ल्यू कंपनीनेही सुमारे 300 खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असल्याचा दावा आंदोलनकर्ते पोकळे यांनी केला आहे. खाजगी सुरक्षा रक्षकांना नियुक्ती देण्याऐवजी शासकीय, निमशासकीय आणि नोंदणीकृत मंडळांनी रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करून घ्यावे अशी मागणी जयवंत पोकळे यांनी केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत, तोवर बेमुदत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे पोकळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply