पाटील आळी मित्र मंडळाची 14 वर्षांची परंपरा
कर्जत : प्रतिनिधी
शहरातील पाटील आळी मित्र मंडळाने या वर्षी किल्ले ईरशाळ या गडाची प्रतिकृती साकारली आहे.
सध्याच्य युगात किल्ले आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे. मात्र किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा, त्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी कर्जतमधील पाटील आळी मित्र मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीत किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात येते. हे मंडळ गेल्या चौदा वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. विशेष म्हणजे या मंडळाचे सदस्य जो किल्ला बनवायचा आहे, त्या किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन त्याची सखोल ऐतिहासिक व भौगोलिक माहिती घेतात आणि दिवाळीत त्याच किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनतात. ही प्रतिकृती पाहण्यासाठी येणार्या प्रत्येक व्यक्तीला मंडळाचे सदस्य किल्ल्याबद्दलची सखोल माहिती देतात.
मंडळाने या वर्षी किल्ले ईरशाळ या गडाची प्रतिकृती साकारली आहे. गडावरील तलाव, पाण्याचे टाके, मंदिर, ईरशाळवाडी तसेच गडाच्या पायथ्याशी असलेले मोरबे धरणसुद्धा दाखविण्यात आले आहे. शहरातील पाटील आळीमध्ये उभारलेली ईरशाळ गडाची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत.