Breaking News

संतप्त प्रवाशांचा नालासोपार्‍यात उद्रेक

नालासोपारा : प्रतिनिधी
लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करीत आहेत, पण एसटी सेवाही बंद असल्याने प्रवासी बुधवारी (दि. 22) संतापले. या वेळी प्रवाशांनी थेट नालासोपारा रेल्वेस्थानक गाठले आणि ते ट्रॅकवर उतरले.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील खासगी आस्थापने सुरू झाली आहेत. त्यात वसई-विरारमधील हजारो नागरिक कामावर जात आहेत. रेल्वेसेवा बंद असल्याने त्यांना प्रवासाठी एसटी महामंडळाच्या बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे, पण बुधवारी सकाळी नालासोपारा बस आगारातील सेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारे चाकरमानी अचानक बंद झालेल्या बससेवेमुळे संतप्त झाले आणि त्यांनी बस आगारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर काही बस सुरू करण्यात आल्या, मात्र त्या अपुर्‍या असल्याने संतप्त प्रवाशांनी आपला मोर्चा रेल्वेस्थानकाकडे वळवला आणि रेल्वे रोको आंदोलन केले.
या वेळी जमावाचा उद्रेक झाला होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना परवानगी का? आम्हालाही परवानगी द्या, अशा मागण्या करीत प्रवाशांनी एक तासाहून अधिक काळ रेल्वेसेवा ठप्प केली. शेवटी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी बळाचा वापर करीत जमावावर नियंत्रण मिळवले. यानंतरही जमावाने पुन्हा एसटी आगारात जाऊन निदर्शने केली. बससेवा वाढवली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर गर्दी कमी झाली. राज्य शासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply