पाली : प्रतिनिधी
विस्तीर्ण समुद्रकिनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, निसर्गसौंदर्य यामुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. मात्र कोरोनामुळे मागील पावणे दोन वर्षांपासून येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. सध्या कोरोनाचे सावट धूसर झाले आहे. अनेक नियम शिथिल केले आहेत. यंदा राहण्या-खाण्याचे दर स्थीर आहेत. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे आणि पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाल्याने स्थानिकांच्या रोजगाराला चालना मिळाली आहे.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. अलिबाग, नागाव, वरसोली, मुरूड, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. तेथील विविध राईडचा आनंदही ते घेत आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र परिचित आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी अजुन काही उन्हाची काहीली कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या कडाक्यात गारवा घेण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल पहायला मिळत आहे. आठवड्याभरापासूनच येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणार्या पर्यटकांची कोणतीच गैरसोय होणार नाही, याची काळजी येथील व्यावसायिक घेत आहेत.
अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर. सध्या तेथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरही पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. समुद्रातील मुरूड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला तसेच उरण जवळील घारापुरी बेटावरील अजंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे.
सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. तसेच तेथील नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटककरामुळे वाढ होण्याची शक्यता आहे.