रोहे : प्रतिनिधी
राज्यघटनेच्या मूलभूत हक्काद्वारे आम्हाला आरक्षण मिळाले आहे, परंतु प्रशासनातील शुक्राचार्य ओबीसींना आरक्षण व मागण्या मान्य होऊ देत नाही. आमचा ओबीसी समाज उत्पादन करणारा समाज आहे. उत्पादन करणारा समाज श्रीमंत असायला पाहिजे, पण असे चित्र दिसत नाही. उलट घरीच बसणारा समाज श्रीमंत आहे. यामुळे यापुढे ओबीसींमधील सगळ्यांना सोबत घेऊन लढाई लढणार असल्याचे ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी येथे जाहीर केले. ते शासकीय विश्रामगृहात आयोजित सभेत बोलत होते. या सभेस ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, आगरी समाज नेते मधुकर पाटील, कुणबी समाज नेते शंकराव म्हसकर, उदय कठे, शिवराम शिंदे, शंकराव भगत, सुरेश मगर, परीट समाज अध्यक्ष नंदकुमार राक्षे, आगरी समाज अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, महादेव कांबळे, ज्ञानदेव पवार, अनिल भगत, अॅड. गोपाळ शिर्के, प्रकाश पवार, अनिल सुर्वे, समीर शिर्के, शिवराम महाबळे, अमोल पेणकर, सतीश भगत, अमित मोहिते, अनंत थेटे, महेश बामुगडे, अरविंद मगर, भाई सुर्वे आदी उपस्थित होते. या वेळी जे. डी. तांडेल यांनी आमची प्रमुख मागणी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. न्यायालयात समाजाच्या मागण्या करत असताना जनसंख्येची माहिती नसते. त्यामुळे न्यायालयात मागण्या मान्य होत नाहीत याकडे लक्ष वेधले. मधुकर पाटील यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाने एकत्रित येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे सांगितले. शंकरराव म्हसकर म्हणाले की, समाजाला संघटित होण्याची गरज आहे ओबीसी समाजातील 381 जातींना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याची आज वेळ आली आहे. प्रास्ताविकात सुरेश मगर यांनी ओबीसी समाजाला एकत्रित करून मागण्या मान्य करण्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रोह्यात ओबीसींच्या प्रश्नासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ओबीसींमधील सर्व समाज घटकांची एकत्रित बैठक बोलावल्याचे नमूद केले. या वेळी अॅड. गोपाळ शिर्के, महादेव कांबळे, समीर शिर्के, नंदकुमार राक्षे आदींनीही विचार मांडले. सभेचे सूत्रसंचालन सतीश भगत यांनी केले. या सभेला रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजातील सर्व घटक उपस्थित होते.