अलिबाग : प्रतिनिधी
तरुणांईसह वृद्धांनाही उत्तेजित करणारा गोपाळकाला रायगडात शनिवारी उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार दहीहंड्यांमधील लोणी गोविंदांनी चोरले. यामध्ये सहा हजार 298 खासगी, तर दोन हजार 122 सार्वजनिक दहीहंड्यांचा समावेश होता. अलिबागमध्ये भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचे विशेष आकर्षण होते. सांगली, सातारा, कोल्हापूरसह कोकण आणि रायगडातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गोविंदोत्सव शनिवारी काही ठिकाणी साध्या पध्दतीने तर काही ठिकाणी नेहमीच्या जोमात साजरा झाला.
मच गया शोर सारी नगरी रे… आया बिरज का बाँका संभाल तेरी घगरी रे… यासह इतर गाणी वाजल्यावर पाय थिरकणारच.
शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. जन्माष्टमीनिमित्त अनेक गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर काही गावांत सप्ताह पार पडला. जन्माष्टमीचा सोहळा घराघरांमधूनही साजरा झाला, तर शनिवारी मिरवणुकाही काढण्यात आल्या होत्या. आकर्षक रंगात रंगविलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या दहीहंड्या ठिकठिकाणी बांधण्यात आल्या होत्या. कुठे सार्वजनिक तर कुणाच्या नवसाच्या दहीहंड्यांचा यात समावेश होता. तरुणाईबरोबरच लहान मुलांचा उत्साहही लक्ष वेधून घेत होता. अलिबाग शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या दहीहंड्या लहान मुलांनी आणि तरुणांनी मानवी थर रचून फोडल्या. तर तालुक्यात गावागावातही गोविंदोत्सव आनंदात साजरा झाला. घरोघरी जाऊन पाणी घेऊन गोविंदा फेर धरून नाचण्याची परंपरा आजही कायम असल्याचे पाहायला मिळाले.
भाजपची दहीहंडी ठरली आकर्षण
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अलिबागमध्ये प्रथमच दहीहंडी पुरस्कृत करण्यात आली होती. एक लाख 51 हजार रुपये बक्षिसाची ही दहीहंडी गोविंदा पथकांसाठी आकर्षण ठरली. दुपारी तीननंतर या दहीहंडी सोहळ्याला सुरुवात झाली.
उत्सवात जुन्या-नव्या गाण्यांचा संगम
गोविंदोत्सवात वाजणारी पारंपरिक गाणी ही वर्षानुवर्षे सर्वांच्याच कानावर पडत आली आहेत. यावर्षीही ही गाणी सर्वत्र ऐकायला मिळत होती. जुन्या गाण्यांचा नवा बाजही त्यानिमित्ताने ऐकायला मिळाला. गोविंदोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या गाण्यांचे स्वरही कानावर पडले. तरुणाई या गाण्यांवर बेभान होऊन नाचत होती. सोबतीला ढोल-ताशांचा निनादही सुरू होता.
उत्सवावर पोलिसांची करडी नजर
गोविंदोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचीही या उत्सवावर करडी नजर होती. तीन दंगल नियंत्रण पथके, एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पोलीस मुख्यालयातील 140 कर्मचारी, 100 होमगार्ड्स ठिकठिकाणी तैनात होते.
पावसाची पाठ
कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या दिवशी पावसाची अपेक्षा असते, मात्र गेल्या काही वर्षांत पावसाच्या लहरीपणामुळे अपेक्षाभंगाचेच पाणी गोविंदांना प्यावे लागत आहे. यावर्षीही पावसाने पाठ फिरवली. सकाळपासून कडकडीत ऊन पडल्याने पाण्याऐवजी घामानेच गोविंदा ओलेचिंब झाले होते.