Breaking News

रायगडातील एसटी कर्मचारी पुन्हा संपावर

परळ आगारातील चालकाच्या हातात अलिबागमधील कर्मचार्‍यांनी भरल्या बांगड्या

अलिबाग : प्रतिनिधी

राज्य सरकारकडून मागण्या मंजूर करून घेण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी सोमवारपासून पुन्हा संपावर गेले आहेत. एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधील 2500  कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. लांब पल्ल्याच्या प्रवाशांबरोबरच ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अलिबाग एसटी आगारात बस घेवून आलेल्या परळ आगाराच्या चालकाच्या हातात अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांनी बांगड्या भरल्या.

राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असताना  परळ डेपोचा चालक काशिनाथ गायकवाड हे सोमवारी परळ ते अलिबाग अशी बस घेऊन अलिबाग आगारात आले. त्याने अलिबाग शहराबाहेरच बस थांबवून प्रवाशांना उतरवले. तिथून परत जात असताना अलिबाग आगारातील संपकरी कर्मचा़र्‍यांनी बस चालकाला बस स्थानकात आणले व त्याच्या हातात बांगड्या भरल्या. याच बसवरील महिला कंडक्टरचाही हार घालून सत्कार केला. यामुळे अलिबाग बस स्थानकात काही काळ तणाव निर्माण झाला होता.  आपल्याला कार्लेखिंड येथे मारहाण करण्यात आल्याची तक्रार बसचालक काशिनाथ गायकवाड याने केली आहे. मारहाणप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अलिबागसह महाड , श्रीवर्धन, माणगाव, रोहा, मुरूड, कर्जत, पेण या आठ आगारातील दोन हजार 500 एसटी कर्मचारी या संपात उतरले आहेत. या आगारातून सोमवारी सकाळपासून एकही बस सुटलेली नाही. ज्या बसेस बाहेर किंवा वस्तीला गेल्या होत्या त्या केवळ आगारात परतत होत्या.

दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. परंतु बसच नसल्याने त्यांना इच्छीत स्थळी पोहोचता आले नाही. या शिवाय सुट्टीनिमित्त बाहेरगावी किंवा नातेवाईकांकडे गेलेल्या अनेकांनी सोमवारी आपापल्या घरी जाण्याचा बेत केला होता, परंतु संपामुळे तो बारगळला. रिझर्वेशन रद्द करावे लागले. कामावर जाणारा नोकरदार वर्ग, ग्रामीण भागातून शहरात येणारे नागरिक यांना या संपाचा फटका बसला. अधिकचे पैसे मोजून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागला. आगारात आलेले प्रवासी खाजगी प्रवासी वाहतूकदारांना शोधत होते. त्यामुळे खाजगी वाहतूकदारांची चलती होती.

संपकरी कर्मचारी सोमवारी सकाळपासूनच आपापल्या आगारात जमले होते. तेथे त्यांनी धरणे धरले. यात  महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. आता सरकारमध्ये विलीनीकरणाशिवाय माघार नाही, असा निर्धार त्यांनी केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply