आपल्या देशातील कोर्ट मध्यरात्री उघडून दहशतवाद्यांच्या फाशीवर सुनावणी घेते. चित्रपट कलाकार, श्रीमंत उद्योगपती यांच्यासाठी मोठमोठ्या वकिलांची फौज उभी राहते. त्यांच्याबाबत तातडीने दिले जाणारे निर्णय. यामुळे देशात ‘कायदा फक्त श्रीमंतासाठी’ काम करतोय का? असा प्रश्न आजपर्यंत सामान्य माणसांच्या मनात यायचा. पण यावेळी तो मुंबई हायकोर्टातील वकिलांनी उभा केलेला आहे आणि फक्त उभाच केला नाही तर कोर्टाला पत्र लिहून ‘सर्वांना समान न्याय’ या तत्त्वाचे पालन करून त्यांच्या पक्षाकारांची बाजूसुद्धा ऐकली जावी, अशी विनंती केली आहे. आर्यन खानच्याबाबतीत, तो एका मोठ्या कलाकाराचा मुलगा आहे, म्हणून ‘विशेष ट्रीटमेंट’ घेऊन लवकर सुनावणी घेतल्या. त्याबद्दल मुंबई हायकोर्टातील काही वकिलांनी आश्चर्य व्यक्त करून आमच्या पक्षकारालाही समान न्याय द्यावा, अशी मागणी केल्याबाबतची स्टोरी ‘आऊटलुक इंडिया’मध्ये आली आहे. त्यांच्या पक्षकारांना बर्याच महिन्यांपासून तारीखसुद्धा मिळत नाही, मात्र आर्यन खानला तारीख मिळते, सुनावणीही होते आणि जमानतसुद्धा मिळते. आज घडीला भारतात सुमारे 3.25 करोड खटले हे निर्णयाच्या किंवा सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आर्यन खानची केस ‘विशेष न्यायाने’ तारखा देऊन लवकर पटलावर आणली, याबाबत मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील आनंद जोंधळे यांनी आवाज उठवला आहे. जोंधळे म्हणतात, कायदा हे सांगत नाही की, एखाद्या बॉलीवूड कलाकाराचा मुलगा आहे, म्हणून त्याची केस ‘विशेष बाब’ म्हणून लवकर ऐकली जावी आणि सामान्य माणसे हे जेलमध्ये खितपत पडून राहावी. वकील डगलस लोपेजसुद्धा मुंबई हायकोर्टात केसेस लढवितात. ते सांगतात की, त्यांनी त्यांच्या पक्षकाराच्या जामिनासाठी 13 ऑक्टोबर 2021 ला याचिका दाखल केली होती. अनेकदा विनंती करूनही त्याची अजूनही सुनावणी झालेली नाही. त्यांचा पक्षकार हा तेलंगणामध्ये सरकारी कर्मचारी आहे आणि तो जेलमध्ये असल्यामुळे मागील दोन महिन्यापासून कामावर गैरहजर आहे. जर त्याची केस ऐकून घेतली नाही तर कदाचित त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते. डगलस लोपेज पुढे असेही म्हणतात की, सदर पक्षकाराला कोर्टाने तत्काळ काही सवलत दिली पाहिजे असे नाही, परंतु मेरीटच्या आधारावर कमीत कमी त्यांच्या पक्षकाराचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यानुसार आदेश दिला पाहिजे. कोर्टाने जर त्यांची केस डीसमिस केली तर कमीत कमी त्यांच्याकडे वरच्या कोर्टात जाऊन दाद मागण्याचा अधिकार तरी राहील, मात्र कोर्टाने अजूनही त्याची सुनावणी न घेतल्यामुळे, खोट्या आरोपांसाठी तो पक्षकार मागच्या दोन महिन्यापासून जेलमध्ये खितपत पडलेला आहे. वकील डगलस लोपेज यांनी असाही सवाल केला की, एक सामान्य नागरिक होणे या देशामध्ये गुन्हा आहे का? वकील अमृतपाल सिंग खालसा यांची सुद्धा अशाच प्रकारची तक्रार आहे. त्यांचा पक्षकार आकाश अजित निकम ऊर्फ अक्क्या हा सप्टेंबर 2015 पासून एका खोट्या खुनाच्या खटल्यात तुरुंगात आहे. मागच्या सहा वर्षात पोलिसांनी फक्त चार्जशीट दाखल केली आहे. वकील अमृतपाल सिंग खालसा म्हणतात की, 25 मे 2021 रोजी पक्षकार आकाश अजित निकम याच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आजपर्यंत 15 वेळा त्यांनी कोर्टासमोर आपली केस मांडण्यासाठी विनंती केली आहे. त्यांनी बरेचदा त्यांची केस लिस्टवर घेण्यासाठी विनंती केली, परंतु अजूनही कोर्टाने तारीख दिलेली नाही. त्यांनी सांगितले की, हजारो केसेस महिने/वर्षापासून कोर्टात पडल्या आहेत, मात्र जर एखाद्या सेलिब्रिटीची केस आली तर सामान्य माणसाच्या सुनावण्या थांबवून त्याची केस प्रथम ऐकली जाते. त्यामुळे सामान्य माणसांसाठी ‘न्याय हा कठीण’ ठरतो. सामान्य माणसाचे सोडा, पण न्यायालयच देशाच्या कायद्यांची आणि नियमांची खिल्ली उडवत आहेत. या काही केसेस आहेत, ज्या आर्यन प्रकरणामुळे वकिलांनी पुढाकार घेऊन मीडियासमोर आणल्या.
‘आऊटलुक इंडिया’ यांनी या विषयावर स्टोरी केली आहे. या स्टोरीमुळे पुन्हा एकदा ‘कायदा हा सर्वांसाठी समान आहे की नाही’ याबाबतीत सामान्य माणसाच्या मनात शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कायद्यातील या त्रुटींमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. त्या कधीतरी होतील या आशेवर सामान्य माणूस जगतो आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-नितीन देशमुख