तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करू, असे डाव्या नेत्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना सीपीएमचे माजी महासचिव प्रकाश करात यांनी सांगितले की, एकीकडे काँग्रेसवाले भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगतात; तर दुसरीकडे ते वायनाड येथून राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात. याचा अर्थ आता केरळमध्ये डाव्यांविरोधात लढण्यालाच काँग्रेसचे प्राधान्य आहे असा होतो.
केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ डावे नेते पी. विजयन यांनीही राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी हे केरळमधील 20 पैकी एका जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्या विरोधात लढणार आहोत. राहुल गांधी यांना दोन ठिकाणांहून लढायचे होते, तर त्यांनी जिथे विरोधात भाजपचा उमेदवार असेल अशा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे होती. काँग्रेसने आज घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुकारलेला थेट लढा आहे, असे विजयन म्हणाले.