Breaking News

सुधागडात आरोग्यदायी कंदमुळांचे भरघोस उत्पादन

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. आदिवासी बांधव तालुक्यातील विविध ठिकाणी कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री  करताना दिसत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी मिळत असला तरी यातून आदिवासींना  चांगला रोजगार मिळत आहे.

सुधागड तालुक्यातील बहुतांशी आदिवासी वाड्यांवर घराशेजारील परसबागेत, माळरानावर व डोंगरावर यंदा कंदमुळांचे मोठ्या प्रमाणत उत्पादन घेतले गेले आहे.  त्यामुळे मागील वर्षी सरासरी 60 ते 70 रुपये किलोने मिळणारी कंदमुळे यंदा अवघ्या 40 ते 50 रुपये किलोने मिळत आहेत. तालुक्यातील पाली, परळी, पेडली येथील बाजारपेठांत तसेच वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर ठिकठिकाणी आदिवासी महिला कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री  करताना दिसतात.

कोरोनामुळे मागील वर्षी कंदमुळांचे उत्पादन घेता आले नाही. तसेच बाजारदेखील बंद होते. त्यामुळे मागील वर्षी किंमत अधिक होती, असे करंजघर येथील कंदमुळे उत्पादक व विक्रेती लक्ष्मी लेंडी यांनी सांगितले. तर नागोठणे येथील दिलीप सोनावणे म्हणाले की या हंगामात मिळणारे हे विविध आरोग्यवर्धक कंदमुळे आवर्जून खातो. शिवाय मुंबई-पुणे आदी शहरात राहणार्‍या नातेवाईकांना भेट म्हणूनदेखील अनेकजण देतात.

आरोग्यवर्धक व चविष्ट

कंदमुळे चवीला गोड व रुचकर असतात. कंदमुळांचे आयुर्वेदिक उपयोगही आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. शरीरात रक्ताची वाढ होते. शरीरातील कार्यशक्ती वाढते. कंदमुळांमध्ये विविध जिवनसत्वे असतात. शरिराला ऊर्जा मिळते. बहुतांश ठिकाणी ही कंदमुळे उकडून तर काही जण भाजून खातात. तर काहीजण याची भाजी बनवून खातात.

आदिवासींनी उत्पादित केलेली कंदमुळे तसेच वरी, नाचणी ही पिके व गावठी भाज्यांच्या विक्रीसाठी शासनाने हक्काची बाजारपेठ दिली पाहिजे. या सर्व मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. वाहतुकीची स्वस्त व्यवस्था केली पाहिजे. यातून आदिवासींचे जीवनमान चांगले उंचावू शकेल.

-रमेश पवार, कोकण संघटक, आदिवासी विकास परिषद, दिल्ली

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply