Breaking News

हायड्रोजन बॉम्ब सोडा, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज!; भाजप नेते आशीष शेलार यांचा जोरदार पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

हायड्रोजन बॉम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या बिर्याणीसारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार पलटवार केला. नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर देत प्रतिहल्ला केला आहे. विविध नावे समोर आणून खूप मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला, पण ते झाले नाही. संपूर्ण राज्याची यंत्रणा लावूनसुद्धा फडणवीस यांना लागू शकेल, असा आरोप मलिक करू शकले नाहीत, अशी टीका शेलार यांनी केली. मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. यांच्यावर गुन्हे नाहीत ही खात्री केल्यावरच त्यांना विविध बोर्डावर पदे देण्यात आली. मुन्ना यादव यांच्यावर जे राजकीय गुन्हे आहेत त्याचे स्पष्टीकरण ते स्वतःच लवकरच करतील. गेली दोन वर्षे मलिक साहेब तुमचे सरकार आहे, तुमच्या नेत्याकडे गृहमंत्रीपद आहे. ज्यांच्यावर आरोप करत आहे त्यांच्यावर साधा अदखलपात्र सुद्धा नोंद करू शकले नाहीत. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा, कोणताही गैरकारभार फडणवीस यांच्या काळात झाला नाही, असे शेलार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बीकेसीमध्ये खोट्या नोटांच्या प्रकरणात आलम शेख याचा उल्लेख केलात हा तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. रियाझ भाटीचा उल्लेख मलिक यांनी केला, आम्ही स्पष्ट करतो की पंतप्रधान कार्यालयाचा याचा काहीही संबंध नाही, असे सांगत शेलार यांनी रियाझ भाटी याचे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्याबरोबरचे फोटो दाखवले. कोणाची नावे बदनाम करण्याकरिता फोटो दाखवण्याचा धंदा करू नका. एक बोट दाखवले तर चार बोटं तुमच्याकडे असतील. रियाझ भाटी आता कुठे आहे? आमचे म्हणणे आहे की त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले आहे. वाझे वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली आहेत त्यामध्ये रियाझ भाटी याचे नाव आहे, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला. मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे की काय? जावयाच्या प्रेमापोटी नीच पातळीवर जाऊ नका, नवाबी पातळीवर जाऊ नका. राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्ते यांना नेस्तनाबूत करण्याचे काम मलिक यांच्याकडून होत आहे. आर्यन खान तुमच्यामुळे अडचणीत आला. शाहरूख खानला अडचणीत आणण्याचे काम केले, अशी घणाघाती टीका शेलार यांनी मलिक यांच्यावर केली. गुन्हेगारांशी व्यवहार करण्यासाठी तुमचे कोणी मास्टरमाईंड होते का? टाडाच्या आरोपीची मालमत्ता सरकारऐवजी तुमच्याकडे कशी आली? याची उत्तरे द्यावी लागतील. पी. बी. सावंत यांच्या रिपोर्टने ज्यांना भ्रष्ट ठरवले ते भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, अशी बोचरी टीका शेलार यांनी या वेळी केली.

मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -दरेकर

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर नाही. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करावेत, असा टोला लगावला आहे. कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणे अशा प्रकारचे काम नवाब मलिक करत आहेत, असेही दरेकर म्हणाले. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आलेले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलीय.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply