Breaking News

लॉकडाऊन काळात औषधी वनस्पतींच्या लागवडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाकाळात गवती चहा, कृष्ण-कापूर तुळस, गुळवेल या औषधी वनस्पतींच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुलझाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे चालकांनी सांगितले.

खारघर वसाहतीच्या मध्यवर्ती असलेल्या उत्सव चौकाशेजारील कोकण कृषी विकास प्रतिष्ठानमधून कोरोनाकाळात गेल्या तीन महिन्यांत हजारो औषधी वनस्पती रोपांची मागणी नागरिकांनी केली आहे. टाळेबंदीच्या काळात सातत्याने औषधी दुकानांप्रमाणे वनस्पती रोपांची विक्री भरमसाट वाढल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक शेखर सावंत यांनी दिली. या मागणीत अग्रेसर असलेल्या रोपांमध्ये गवती चहा, तुळस, गुळवेल, ओवा, गोकर्णवेल, अडुळसा, लेंडीपिंपळी अशा रोपांना घरच्या गच्चीत जागा मिळू लागले आहे.

घरीच तयार करण्यात आलेल्या सेंद्रिय खतांच्या साह्याने ही रोपे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे त्यातील औषधी गुण टिकून आहेत. कोरोनाकाळात सर्वत्र आरोग्यविषयक जागृती वाढली असताना या तीन वनस्पतींचे सेवन वाढल्याची माहिती येथील रोपवाटिका केंद्रमालकांनी दिली. सध्या केंद्रमालकांनीही या वनस्पतींची निपज वाढविण्यावर भर दिला आहे.

शहरशेतीचा वसा

जूनच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर अनेकांनी शहरशेतीला प्राधान्य दिले. पालकांनीही मुलांच्या प्रयोगशीलतेला प्रोत्साहन दिले. यात छतावरील औषधी वनस्पती रोपांच्या वाढीसाठी मुलांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी रोपवाटिका केंद्रातून औषधी वनस्पतींचे रोपे मुलांनी मागवली. अनेक रोपवाटिका केंद्रचालकांनी मुलांना समाजमाध्यमावरून  मार्गदर्शन केले. गवती चहा (लेमन ग्रास)चा चहातील उपयोग वाढला आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलचे सेवन केले जात आहे. गोडमार आणि इन्सुलीन यासह इतर औषधी वनस्पतींच्या मागणीत वाढ झाल्याचे केंद्रचालकांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply