मुंबई ः प्रतिनिधी
खंडणी वसुली आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) कोठडी तीन दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक दिवस गायब असलेले देशमुख अखेर 1 नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची 12 तास चौकशी करून मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुखांवर मनी लॉण्डरिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करीत 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर आता त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडी कोर्टाने दिले आहेत.