Breaking News

अशांत महाराष्ट्र

पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र सध्या अनेक कारणांनी धूमसतोय. आधीच राज्यात शेतकर्‍यांचे प्रश्न, एसटी कर्मचार्‍यांचा संप यावर मार्ग काढण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याने अस्वस्थता पसरलेली असताना आता हिंसाचाराचा वणवा पेटलाय. निमित्त झाले ते त्रिपुरातील कथित घटनेचे. यावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांत मोर्चे निघाले आणि जे व्हायला नको होते तेच झाले.

देशाच्या ईशान्य भागात असलेल्या त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक तणाव पसरलेला आहे. खरे तर याचे मूळ बांगलादेशात आहे. नवरात्रोत्सवादरम्यान बांगलादेशात दुर्गापूजेचे मंडप काही धर्मांध मंडळींनी उद्ध्वस्त केले होते. त्याचे पडसाद त्रिपुरात उमटले. त्रिपुरा हे राज्य बांगलादेशला लागून असल्यामुळे या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य कुणीही करणे समर्थनीय नाही, परंतु क्रियेवरील ती प्रतिक्रिया होती, पण म्हणून याचे भांडवल करून हिंसाचार पसरविण्यात कुठला आलाय पराक्रम. मुख्य म्हणजे जी गोष्ट घडलीय की नाही याची पूर्णत: माहिती नसताना राडा करण्यात काय मतलब, मात्र काही लोक जणू अशाच घटनांची वाट पाहत असतात. या अनुषंगाने रझा अकादमीकडे बोट दाखविले जात आहे. त्रिपुरातील कथित अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात शुक्रवारी मोर्चे निघाले. अमरावती, मालेगाव, नांदेड, हिंगोली, भिवंडी यांसारख्या शहरांत हे मोर्चे काढण्यात आले होते. लोकशाहीप्रधान आपल्या देशात म्हणणे मांडण्याचे, आंदोलन काढण्याचे सर्वांना स्वातंत्र्य आहे, मात्र या मोर्चांना हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी दगडफेक, तोडफोड झाली, ज्याचा नाहक फटका अनेक घटकांना बसला. या हिंसाचारामध्ये अनेक खाजगी तसेच सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये भाजपकडून शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. नागरिक, व्यापार्‍यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला, पण या वेळी जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी आदल्या दिवशी झालेल्या हिंसाचाराविरोधात जोरदार निदर्शने केली, तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. सध्या अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तेथे संचारबंदी लागू करण्यात आली असून तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. वास्तविक पाहता 130 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्व सण-उत्सव सलोख्याने साजरे करतात, पण कधी तरी अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण होते. मग जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहतात. हे थांबायला हवे. प्रत्येकाने शांतता व संयम राखल्यास अनर्थ टळू शकतो. यामध्ये राज्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या आघाडीत तीन पक्षांचा समावेश आहे. त्यांनी अशा वेळी एकत्र येऊन परिस्थिती कशी आटोक्यात येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, मात्र हेच सरकार सोयीस्करपणे भूमिका घेत आहे. त्यामुळे इतर गोष्टींपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी हे सुनियोजितपणे घडविले जात नाही ना, अशी शंका येण्यास वाव आहे, तर याच आघाडीतील काही नेते आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांना प्रथम त्यांच्या पक्षप्रमुखांनी रोखणे आवश्यक आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply