दोन दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाकडून आश्वासन
पनवेल ः वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना केवळ शासकीय दप्तरी नोंद करण्याइतपत शिल्लक राहिलेला आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी निर्बंध हटविल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका लेवल-3मध्ये असल्याने व्यापार्यांना जाचक निर्बंधांना सामोरे लावे लागत आहे. या विरोधात कामोठ्यातील व्यापार्यांनी बुधवारी (दि. 11) दुकाने खोलो आंदोलन केले. याची दखल घेत प्रशासनाने दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, राज्य शासनाने दुकानांच्या वेळा 10पर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याने पनवेल महापालिका प्रशासन याबाबत परिपत्रक कधी काढते याकडे येथील व्यापार्यांचे लक्ष लागले आहे.
निर्बंधांमुळे पिचून गेलेल्या कामोठ्यातील व्यापार्यांनी भाजपचे नगरसेवक विकास घरत यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. घरत यांनी व्यापार्यांचे शिष्टमंडळ घेऊन आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांना व्यापार्यांच्या अडचणींबाबत अवगत केले. आयुक्तांनी दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर हा विषय कळवून सकारात्मक तोडगा काढून देण्याचे आश्वासन दिले, पण गेले 17 महिने कोरोना महामारीमुळे प्रचंड नुकसान सहन कराव्या लागलेल्या व्यापार्यांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईप्रमाणे आम्हीदेखील दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू ठेवणार, असा पवित्रा घेतला तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये फिरून दुकाने उघडी ठेवा अशी मोहीम राबविली.
अशा वेळी त्यांच्याशी चर्चा करायचे सोडून अधिकार्यांनी एक दुकान सील करण्याचा घाट घातला. ते समजताच कामोठे भाजप लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली व्यापार्यांचा जत्था त्या ठिकाणी जाऊन धडकला. मुद्देसूद अभ्यासावर वॉर्ड ऑफिसर चर्चा करण्यास तयार नव्हते. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना आणि उपायुक्तांना पाचारण करण्यात आले. व्यापार्यांनी उपायुक्त गुळवे यांच्याशी चर्चा करून अद्यापही पनवेल महानगरपालिका लेवल-3मध्ये का आहे, असा प्रश्न केला. यावर उपायुक्तांकडे समाधानकारक उत्तर नव्हते.
अखेरीस कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने नगरसेवक विकास घरत यांनी आगामी दोन दिवसांत 4 वाजता दुकाने बंद करू, परंतु या मुद्द्यावर आम्हास बैठक पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यावर उपायुक्तांनी शुक्रवारी याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी व्यापार्यांचे शिष्टमंडळ, कामोठे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात भाजपच्या वतीने नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, हॅप्पी सिंग यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव सहभागी झाले होते.
व्यापार्यांच्या पाठीशी उभे राहू -नगरसेवक विकास घरत
या वेळी बोलताना नगरसेवक विकास घरत यांनी सांगितले की, गेल्या 17 महिन्यांपासून व्यापारी प्रचंड नुकसान सहन करीत आहेत. दुकान उघडण्यासाठी वेळेचे निर्बंध असले तरी दुकानाचे भाडे, कर्मचार्यांचे पगार, महावितरणची बिले आदी थांबलेले नाही. आवक नसतानादेखील व्यापार्यांनी पदरमोड करून अर्थव्यवस्था जिवंत ठेवली. आज जर लोकसंख्यानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहून लेवल ठरविण्यात येत असेल तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बाधित रुग्ण संख्या अत्यल्प आहे. असे असताना महानगरपालिकेचे अधिकारी कुठलीही चर्चा न करता मग्रूरपणे कारवाईचा बडगा उगारण्यासाठी तयार असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव व्यापार्यांच्या पाठीशी उभे राहू.