रेवदंडा : प्रतिनिधी
गेले तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा, पावसाचे हवामान खात्यानेनिर्देश दिल्याने लॉकडाऊननंतर नुकताच तेजीत आलेला पर्यटन व्यवसाय पर्यटकांनी पाठ फिरविल्याने मंदित आला आहे. पर्यटकांचे हाऊसफुल्ल शनिवार, रविवार सुद्धा बदलत्या हवामानाने शटडाऊन राहिल्याचे चित्र होते, तर समुद्रकिनारी तुरळक पर्यटक दिसले. अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, अलिबाग, नागाव, रेवदंडा, तसेच मुरूड तालुक्यातील काशिद, नादगाव व मुरूड समुद्र किनारे लॉकडाऊन पूर्णतः शिथिल झाल्याने बहरू लागले होते. शनिवार व रविवार हाऊसफुल्लचे चित्र दिसत होते. अनेक दिवस स्वतःला घरात कोंडून ठेवलेल्या पर्यटकांनी अलिबाग व मुरूडच्या समुद्रकिनारी धाव घेतली. ऐन दिवाळीच्या काळात पर्यटकांचा महापूर येथील समुद्रकिनारी दिसून येत होता. त्यातच हवामान खात्याने वादळी पावसाच्या दिलेल्या सर्तकतेच्या इशाराने पर्यटकांनी सुद्धा समुद्र किनार्याला सुटी दिली. परिणामी नुकतेच पर्यटकांच्या गर्दीने बहरलेले समुद्र किनारे ओस पडलेले दिसले. अगदीच तुरळक पर्यटकांची हजेरी समुद्र किनारी दिसत होती. पर्यटकांच्या आगमनाने जोश्यात आलेले हॉटेल, लॉजिंग, रिक्षावाले, गादीवाले आदी व्यावसायिक सुध्दा गुमान बसून होते. अलिबाग व मुरूडकडे दर शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी दिसणारी वाहनांची रेलचेल मुख्यः रस्त्याला तुरळक असल्याचे जाणवले, त्यामुळे या वेळी शनिवार व रविवार मुख्यः रस्त्याच्या नाक्यावर पर्यटकांच्या लहानमोठ्या वाहनाने ट्रफिक जॅमचे चित्र दिसलेच नाही. हवामान बदलाने अलिबाग व मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी चक्क पाठ फिरविल्याचे चित्र दिसले, एकूणच कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर नुकताच जोशात आलेला पर्यटन व्यवसाय कोलमडून गेला. नित्याचे हाऊसफुल्ल शनिवार व रविवार सुटीचे दिवशीच शटडाऊन डे असल्यासारखे वाटत होते.