कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील वनविभागाच्या कर्जत पूर्व क्षेत्रात असलेल्या हुमगाव बिटमधील वनजमिनीवर सिमेंट बांधकाम करून भणीत बांधण्यात आली आहे. ती भिंत पाहण्यास गेलेल्या वनविभागाच्या कर्मचार्यांवर वनजमिनीमध्ये सिमेंट बांधकाम करणार्या स्थानिकाने हल्ला केला आणि त्यांना जखमी केले. वनमजुराला रक्तबंबाळ करून स्थानिक रहिवासी थांबला नाही, तर त्याने वनमजुरावर लोखंडी हत्यार घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वनरक्षक यांनी मध्यस्थी केल्याने वनमजुराचे प्राण वाचले. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यात वनविभागाचे तीन परिक्षेत्र असून त्यातील हुमगाव परिक्षेत्रात पाच बिट आहेत. त्यातील भालिवडी बीटमध्ये त्या भागातील आंबोट गावाचे रहिवासी वनमजूर नाथा भागा मसणे हे सावळे बीटचे वनरक्षक जी. आर. काकडे आणि हुमगांव बीटच्या वनरक्षक कल्याणी आव्हाळे यांच्यासह वनजमिनीमध्ये केलेले बांधकाम पाहायला गेले होते. त्या वेळी गौळवाडी संरक्षित वनामध्ये भालेवाडी येथील राजेश उर्फ बापू वसंत कर्णूक यांनी सिमेंट बांधकाम केले असल्याचे वन कर्मचार्यांच्या नजरेस आले.
त्यामुळे वनरक्षक कल्याणी आव्हाळे आणि जी. आर. काकडे यांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. कारवाई होण्याच्या भीतीने राजेश ऊर्फ बापू कर्णूक याने त्या ठिकाणी उभे असलेले वनमजूर नाथा भागा मसणे यांना दगड टाकून ठेवलेल्या जमिनीवर ढकलले. वनमजूर नाथा मसणे यांच्या डोक्याला मार लागला आणि ते रक्तबंबाळ झाले. तेवढ्यावर कर्णूक थांबले नाहीत तर त्यांनी लाकडी दांडके आणून वनमजूर मसणे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी वनरक्षक काकडे यांनी ते भांडण मिटवले आणि जखमी अवस्थेत असलेले वनमजूर मसणे यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कर्जत पोलिसांनी वनमजूर नाथा भागा मसणे यांना दगडावर ढकलून रक्तबंबाळ केल्याबद्दल आणि खलास करण्याची धमकी दिल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याबद्दल आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनपाल-वनरक्षक संघटनेचे कार्यध्यक्ष सुनील कापसे, सचिव एम. डी. तावडे यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper