Breaking News

उपांत्य फेरी गाठण्यात मुंबई अपयशी

सुरत : वृत्तसंस्था

नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईचे सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव (80 धावा), श्रेयस अय्यर (नाबाद 80) आणि पृथ्वी शॉ (57) या तिघांनी साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे मुंबईने अव्वल साखळीच्या ‘ब’ गटातील अखेरच्या लढतीत पंजाबवर 22 धावांनी विजय मिळवला, परंतु निव्वळ धावगतीच्या शर्यतीत पिछाडीवर राहिल्यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.

या विजयामुळे मुंबईच्या खात्यात चार सामन्यांतून 12 गुण जमा झाले. कर्नाटकचेही तितक्याच सामन्यात 12 गुण आहेत, मात्र निव्वळ धावगती मुंबईपेक्षा सरस असल्यामुळे कर्नाटकने गटात दुसरा क्रमांक मिळवून अग्रस्थानावरील तामिळनाडूसह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. मुंबईला पंजाबला 150 किंवा त्याहून कमी धावांत रोखणे अनिवार्य होते.

लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार आणि श्रेयस यांनी तिसर्‍या गड्यासाठी 66 चेंडूंत 140 धावांची भागीदारी रचल्यामुळे मुंबईने 20 षटकांत तब्बल 3 बाद 243 धावांचा डोंगर उभारला होता. पंजाबला 6 बाद 221 धावांपर्यंतच मजल मारता आली.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply