Breaking News

नागोठण्यात पूरसदृश परिस्थिती

नागोठणे : प्रतिनिधी – सोमवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने मंगळवारी (दि. 4) सकाळी आपले पात्र ओलांडून परिसरात पुराचे पाणी भरावयास प्रारंभ केल्याने नागोठणे शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुपारी दोनच्या सुमारास नागोठणे एसटी बसस्थानक, नागोठणे-रोहे जुना रस्ता तसेच इतर सखल भागात पुराचे शिरले होते. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर छत्रपती शिवाजी चौक, बाजारपेठ आणि कोळीवाडा भागात पुराचे पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर परिस्थितीवर स्थानिक पोलीस लक्ष ठेवून असून, छत्रपती शिवाजी चौक भागात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

रोहा-अष्टमी पुलावरून पाणी

रोहा : प्रतिनिधी – रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने सोमवारी सायंकाळी सुरुवात केली. रात्रभर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रोहा-अष्टमीला जोडणार्‍या पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी हा पूल वाहतुकीस बंद करण्यात येऊन या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.रोहे शहर तसेच ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र दिसून येत होते. डोंगरमाथ्यावरील नाले भरून वाहात होते. हे पाणी कुंडलिका आले व ही नदी दुथडी भरून वाहात होती.

सुधागडमध्ये जनजीवन विस्कळीत

पाली : प्रतिनिधी – मुसळधार पावसामुळे सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी पाली, जांभुळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व गावाला अंबा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने वेढा घातला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. दरम्यान, कोरोना व अतिवृष्टीने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

मुरूडमध्ये वारा-पावसामुळे होड्या किनार्‍यावर स्थिरावल्या

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, त्याच्या प्रतीक्षेत असणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात एकाच दिवसात 90 मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने शेतामध्ये आता पाणीच पाणी दिसत आहे. दुसरीकडे वादळी पावसामुळे मच्छीमारांचा खोळंबा झाला असून, नारळीपौर्णिमेनंतर आपल्या नौका खोल समुद्रात मासेमारीसाठी न नेता कोळी बांधवांनी त्या किनारी शाकारल्या आहेत. मुरूड तालुक्यात सोमवारपासून जोरदार वार्‍यांसह पाऊस कोसळत असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडे पडली, तर काहींचे पत्रेसुद्धा उडाले आहेत, परंतु या घटना तुरळक प्रमाणात घडल्या आहेत. दरम्यान, वारा-पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिक हैराण झालेले दिसून आले.तालुक्यात नदी, नाले व तलाव पाण्याने तुडूंब भरून वाहत आहेत. गेले काही दिवस पावसाने पाठ फिरवली होती. अगदी अल्प प्रमाणात पाऊस व कडक ऊन पडत होते. त्यामुळे शेतीमधील पाणी पूर्ण सुकून पिकाचा प्रश्न गहन बनला होता, परंतु सोमवापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला आहे.  बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी जोरदार वार्‍यामुळे मच्छीमारांना पुन्हा  फटका बसला आहे. 1 ऑगस्ट रोजी मासेमारीसाठी गेलेल्या काही बोटी किनार्‍यावर स्थिरावल्या आहेत, तर नारळी पौर्णिमेनंतर जाण्यासाठी निघालेल्या बोटी थबकल्या आहेत. वारा व पाऊस अजून दोन दिवस कायम असल्याने वातावरण शांत होताच कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात जाणार आहेत.

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply