सर्वपक्षीय कृती समिती मागणीवर ठाम
नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी
भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नेतृत्व व कर्तृत्व श्रेष्ठ होते व राहील. ते देशाला दिशा देणारे नेते होते. ‘दिबां’च्या जयंती दिनी 13 जानेवारी रोजी मेळावा घ्यायचा की आंदोलन करायचे याबाबत 1 जानेवारी रोजी घोषणा केली जाईल, पण त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी पुकारलेला लढा सुरूच राहील, असा निर्धार लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांनी मंगळवारी (दि. 7) नवी मुंबईत व्यक्त केला. ते वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या भूमिपुत्र मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दशरथ पाटील पुढे म्हणाले की, कोरोना, नैसर्गिक आपत्ती, सणवार यामुळे विमानतळ नामकरणाच्या लढ्यात खंड पडला असला तरी चळवळ काही थांबलेली नाही. आमचा लढा हा केवळ नामकरण होईपर्यंतचा नसून तो प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न जोवर सुटत नाहीत तोवर कायम पेटलेला राहील.
‘दिबां’नी देशाला अनेक कायदे दिले. देशानेही त्यांचा गौरव केला. केंद्र सरकारदेखील आमच्या मागणीसंदर्भात सकारात्मक असून केंद्रीय मंत्र्यांनी विनंती केल्याने आम्ही विमानतळाचे काम बंद पाडले नाही, मात्र राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर ‘दिबां’च्या नावासाठी पुकारलेल्या लढ्यात हौतात्म्य स्वीकारण्यासही तयार असल्याचे दशरथ पाटील यांनी सांगत सरकारला इशारा दिला.
कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कृती समिती स्थापन झाली व लढ्याला सुरुवात झाली. काही लोकांनी संशय व्यक्त केला की लढा थांबला की काय? मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिल्याशिवाय लढा थांबणार नाही. आपल्या आंदोलनाचा दणका इतका जबरदस्त होता की, दिल्लीकडे जाणारा ठराव
राज्य सरकारला थांबवावा लागला, मात्र तो ठराव विखंडित करण्यासाठी काय करता येईल ते ठरवावे लागेल. जर आपले ऐकले नाही, तर सिडकोमध्ये घुसून उत्तर द्यायची तयारी ठेवा.
सिडकोने भूमिपुत्रांची काय अवस्था केली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. आपण नागवले गेलो आहोत. जमिनीसोबत आपल्यावरून बुलडोझर चालले आहेत. सिडकोने साडेबारा टक्के व साडेबावीस टक्के जाहीर केले, मात्र अनेकांना अडचणीच्या ठिकाणी भूखंड दिल्याने ते बदलून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना फेर्या माराव्या लागत आहेत. 50 टक्के लोकांनादेखील नुकसानभरपाई मिळालेली नाही, याकडे कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष वेधले.
नवी मुंबई विमानतळाबाबत आमच्याकडे आमचा अधिकार आहे आणि लोकनेते दि. बा पाटील यांचेच नाव द्यावे ही आमची मागणी आहे. असे असताना शासनाविरोधात बोलल्यावर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. भूमिपुत्रांवर मोजून व ठरवून कारवाई केली गेली. नोटिसा पाठवण्यात आल्या. केसेस दाखल केल्या, मात्र आपला भूमिपुत्र झुकला नाही. उलट आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला तर तो त्वेषाने पेटून उठेल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
कृती समितीचे सरचिटणीस भूषण पाटील म्हणाले की, शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सिडकोने केलेला ठराव विखंडित करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. भिवंडीचे भारद्वाज चौधरी यांनी, जर तुमचा आमच्या बापाच्या नावाला विरोध असेल तर बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध राहणार, असे स्पष्ट केले. दशरथ भगत म्हणाले की, दि. बा. पाटील ही तमाम भूमिपुत्रांची ओळख आहे. त्यामुळे या नावासाठी कोणताही लढा उभारण्यास तयार आहोत. डॉ. राजेश पाटील यांनी ग्रामस्थ कृती समितीकडे आशेने पाहत असून प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
खजिनदार जे. डी. तांडेल, गुलाब वझे, मनोहर तांडेल यांचीही भाषणे झाली. या वेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, कृती समितीचे मनोहर पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, शैलेश घाग आदींसह पाचही जिल्ह्यांतून आलेले भूमिपुत्र उपस्थित होते.