सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टिकोनातून पनवेल नगरीचा शाश्वत विकास होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असतात. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे सातत्याने होत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक 261 मधील मच्छी मार्केट व पार्किंगचा रस्ता काँक्रटीकरण करणे,
तसेच पार्किंग क्षेत्रातील उंची वाढवणे हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी एक कोटी 26 लाख रुपये खर्च होणार असून यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिचंद्र भगत, गणेश भगत, विभागीय अध्यक्ष पवन सोनी, ठेकेदार एल. टी. पाटील, मंगेश पिळविलकर, एकनाथ भोईर, लहू कोळी, कमलाकर कोळी, गजानन म्हात्रे, दत्ता पाटील, धर्मा भगत आदींसह नागरिक उपस्थित होते.