प्रकल्पांसाठी सक्तीचे भूसंपादन थांबवण्याची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेले सक्तीचे भूसंपादन थांबवावे या मागणीसाठी मुरूड, रोहा आणि पेण तालुक्यातील शेतकर्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध संघटना, तसेच भाजप व शेकापचे नेते सहभागी झाले होते.
आमदार रविशेठ पाटील, जयंत पाटील, उल्का महाजन, अरुण शिवकर, वैशाली पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांच्या मागण्या राज्य सरकारला कळवण्यात येतील, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
अलिबाग येथील शेतकरी भवन येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जनरल अरुण कुमार वैद्य विद्यालयाजवळ आला असता पोलिसांनी अडविला. या ठिकाणी मोर्चेकरी शेतकर्याना सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी संबोधित केले.
या वेळी आमदार जयंत पाटील म्हणाले की, यापूर्वी सरकारने इथल्या शेतकर्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत, परंतु त्या विनावापर पडून आहेत. आता आणखी नव्याने संपादन कशासाठी केले जात आहे. आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे; अन्यथा इथल्या जमिनीवर पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
रोहा आणि मुरूड तालुक्यात बल्क ड्रग पार्क प्रकल्प प्रस्तावित आहे. पेण तालुक्यात डोलवी येथील एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, अलिबाग विरार कॉरिडॉरसाठी सक्तीचे भूसंपादन थांबवावे, हेटवणे धरणाचे पाणी पुरवून शेती दुपिकी करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. यापूर्वी जिल्ह्यात औद्योगिकीकरणासाठी संपादित केलेल्या जागा वापराविना पडून आहेत, त्यांचा वापर उद्योगांसाठी करावा, आधीच औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे यापुढे भूसंपादन करून शेतकर्यांना भूमिहीन आणि बेरोजगार करू नका, अशी मागणी या वेळी प्रशासनाकडे करण्यात आली.
या वेळी पेणचे आमदार रविशेठ पाटील, आमदार जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, वैशाली पाटील, अरुण शिवकर आदी या मोर्चात सहभागी झाले होते.