नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले असले तरी काँग्रेस या संदर्भात भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कधी नव्हे ते देशात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी अस्तित्वात आली या नव्या प्रयोगात नेत्यांना स्वतःच्या आमदारांनादेखील एकमेकांविरोधात सांभाळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे आयुष्यभर आपले प्रभाग व विभाग पिंजून काढून पक्षाची ताकद तयार केलेल्या कार्यकर्त्यांसमोर आघाडीतून लढण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. आघाडी होणार असली तरी कार्यकर्त्यांसमोर मात्र आपल्या प्रभागातून ज्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्यांच्यासाठी प्रचार करावा लागणार आहे. कित्येकवर्ष स्वतःच्या पक्षाची निशाणी अभिमानाने मिरवणार्या कार्यकर्त्यांना मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आव्हान समोर असेल. त्यात मित्र पक्षाचा उमेदवार हरल्यास पुन्हा एकमेकांवर कामे न केल्याचे आरोप प्रत्यारोप सहन करावे लागणार असून हे वाद नेत्यांना सोडवावे लागणार आहेत. हीच भीती ज्यांना उमेदवारी मिळाली आहे अशा उमेदवारांनादेखील सतावणार आहे. विजय तर दूरच; मात्र मित्रपक्षातील इच्छुक उमेदवारांना व कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांना आपलेसे करावे लागणार आहे. आजपर्यंत असलेले हेवेदावे दूर करून आपला प्रचार करावा यासाठी मान अपमान बाजूला ठेवून हात जोडावे लागणार आहेत. पॅनल पद्धत असल्याने महाविकास आघाडीला आघाडी होऊनही हे आव्हान ओलांडून मग निवडणूक विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.