Breaking News

हिवाळी नव्हे, वादळी!

अवघ्या आठवड्याभरात हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या इराद्याने महाविकास आघाडी सरकारने मुंबईमध्ये सभागृहाचे कामकाज सुरू केले खरे, परंतु येत्या आठवड्याभरात कशाकशाला तोंड द्यायला लागणार आहे याची चुणूक सत्ताधार्‍यांना पहिल्या दिवशीच मिळाली असेल. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला जबरदस्त धारेवर धरले. फडणवीस यांच्या तोफखान्यापुढे सत्ताधारी अक्षरश: हतबल झालेले बघायला मिळाले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या हातात आयताच मुद्दा आणून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अकारण टीका करताना ऐन सभागृहामध्ये अंगविक्षेप करत त्यांनी मोदी यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या सदस्यांनी त्यांचा यथेच्छ धिक्कार केला. पंतप्रधान हे फक्त माझ्या एकट्याचे नाहीत तर ते सार्‍या देशाचे आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यांचा असा अधिक्षेप सहन केला जाणार नाही. आमदार भास्कर जाधव यांचे वर्तन आक्षेपार्ह असून त्यांना ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. काही काळ सभागृहात गोंधळ होऊन कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाची भावना दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली. भाषणाच्या ओघात मी केलेले अंगविक्षेप आणि माझे शब्द मी मागे घेतो असेही ते म्हणाले. परंतु अंगविक्षेप कसे काय मागे घेता येऊ शकतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. भास्कर जाधव यांच्यामुळे सरकार बॅकफुटवर गेल्याचे बघायला मिळाले. त्याआधी सकाळच्या सत्रात अध्यक्ष निवडीसाठी नियमात बदल करण्याचा डाव रचल्याबद्दल फडणवीस यांनी सरकारवर खरपूस टीका केली. स्वत:च्याच आमदारांना इतके घाबरणारे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही पाहिले नाही हे फडणवीस यांचे वक्तव्य अतिशय वास्तवदर्शी आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड नेहमीच गुप्त मतदान पद्धतीने होते. विधिमंडळाच्या स्थापनेपासूनच ही परंपरा चालू आहे. परंतु इतिहासात प्रथमच महाविकास आघाडी सरकारने ती निवड आवाजी मतदानाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सादर करण्यात आला. विधानसभेत महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत आहेे. तरीही त्यांना गुप्त मतदान का टाळावेसे वाटले, हा खरा सवाल आहे. गुप्त मतदान झाल्यास आपलेच आमदार फुटतील ही भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये गेली दोन वर्षे घर करून आहे. कोरोना काळामुळे या वास्तवाला तोंड देण्याची वेळ मविआ सरकारवर आली नव्हती. कारण अध्यक्ष निवडीचे गुप्त मतदान यशस्वीरित्या पार पाडू शकू याचा आत्मविश्वासच या सरकारमध्ये नाही. मुळात हे सरकार लोकशाही मार्गाने नव्हे तर मागल्या दाराने आले. शिवसेना-भाजप युतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु जनतेचा कौल धुडकावून, तीन नापास मुलांनी आपल्या तुटपुंज्या मार्कांची बेरीज करून एकत्रित उत्तीर्ण झाल्याचे घोषित करावे तशातला प्रकार झाला. आडमार्गाने सत्तेवर आलेले सरकार आडमार्गानेच टिकून राहू शकते. घोडेबाजार होऊ नये म्हणून हे पाऊल उचलल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले सभागृहातील चर्चेत म्हणाले. स्वत:च्या आमदारांनाच विकाऊ घोडे समजणार्‍या या सरकारचे नेमके काय करायचे हा प्रश्न महाराष्ट्राची जनता योग्य वेळी सोडवेलच.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply