मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर स्वतःचे नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करीत मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेले दोन दिवस साखळी आंदोलन करीत आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे अभाविपने बुधवारी (दि. 22) शिक्षणातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध निदर्शने केली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारच्या या मनसुब्याविरोधात अभाविपने पोतराज बनत आसूड ओढला. मंत्रिमंडळ निर्णयानुसार विद्यापीठ कायद्यात केलेले बदल म्हणजे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा डाव आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे मत अभाविप कोकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले. संबंधित निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा; अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.