Saturday , June 3 2023
Breaking News

सोनारीच्या विकासाला प्राधान्य देणार : पूनम कडू

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढू लागला असून, भाजप-शिवसेना युतीच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. पूनम कडू यांनीही सोनारीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे. अत्यंत साध्या, सरळ स्वभावाच्या, तसेच कार्यक्षम असलेल्या पूनम कडू या महिलावर्गात लोकप्रिय असून, त्यांना गावातील महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पूनम यांचे पती महेश कडू हे सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात सोनारी गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला. त्यामुळे गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपाच्या माध्यमातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. भाजप नेते महेश बालदी यांचे महेश कडू हे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पूनम कडू या सरपंचपदी विराजमान झाल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सोनारी गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागून विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. भाजप-शिवसेना युतीच्या पूनम कडू या थेट सरपंचपदाच्या उमेदवार रोड रोलर ही निशाणी घेऊन निवडणूक लढवित आहेत; तर प्रभाग क्र. 1 मधून अश्विनी हरिश्चंद्र कडू (निशाणी-गॅस सिलिंडर), हेमांगी गणेश म्हात्रे (छताचा पंखा), जगदीश मोरेश्वर म्हात्रे (कपाट) रिंगणात आहेत. प्रभाग क्र.2 मधून जगदीश कान्हा म्हात्रे (गॅस सिलिंडर), रेश्मा दीपक कडू (छताचा पंखा), मेघश्याम नारायण कडू (कपाट) आणि प्रभाग 3 मधून रेश्मा नंदकुमार कडू (गॅस सिलेंडर), ममता सुरेश कडू (छताचा पंखा), संदीप केशव कडू (कपाट) हे उमेदवार विरोधकांशी टक्कर देणार आहेत. भाजप-शिवसेना युती भक्कमपणे निवडणुकीस सामोरी जात असून, महेश कडू यांना साथ देणारे मेघश्याम कडू हे सलग चार वेळा जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवसेनेत त्यांचे मोठे योगदान असल्याने भाजप-शिवसेना मोठ्या बहुमताने सरपंच व सदस्य निवडून आणेल असा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आहे. पूनम कडू यांना मत म्हणजे सोनारीच्या विकासाला मत असे समीकरण झाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ’जल्लोष सुवर्णयुगाचा’

रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे दानशूर व लाडके …

Leave a Reply