Breaking News

महाडची शान डॉ. हिम्मतराव बावस्कर

स्वराज्याची राजधानी महाडमध्ये! स्वराज्य जननी जिजाऊंची समाधी महाडमध्ये! छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महाडमध्ये! डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या समता चळवळीचे चवदारतळे महाडमध्ये! दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ महाडमध्ये! सम्राट अशोक कालीन बौद्धलेणी महाडमध्ये! सी. डी. देशमुखांचे जन्मगाव महाडमध्ये! आणि आता पद्मश्री पुरस्कार महाडमध्ये!महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या भूमीत, अनेक विचारवंत जन्माला आले. रक्ताचा एकही थेंब न सांडता जंजिरा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करणारे क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित हे याच महाडच्या भूमीतील. वनराईचे संस्थापक कै. मोहन धारिया, दादासाहेब सावंत, समतेची चळवळ उभारणारे अमलकांत टिपणीस, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त इतिहासतज्ज्ञ प्रभाकर भुस्कुटे, स्वराज्याचे शिलेदार मुरारबाजी देशपांडे, नरवीर तानाजी मालुसरे, राजे महाडिक अशी एक ना अनेक नररत्ने याच भूमीने दिली. कोकणात विंचू व सर्पदंशाने मृत्युमुखी पडणार्‍या हजारो जणांना प्रभावी लस तयार करून जीवदान देण्याचे काम करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर हे या रत्नांपैकी एक. ज्यांनी सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्यातील असामान्यत्व सिद्ध करून दाखवले. संपूर्ण देशात अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या पद्मश्री पुरस्कारासाठी डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची केंद्र सरकारने केलेली निवड ही त्यांच्या आजवरच्या संशोधनाचे सार्थक आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचे श्रेय डॉ. बावस्कर यांनी आपले सर्व सहकारी आणि महाडकरांना दिले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अत्यंत साधी राहणीमान असणारे डॉ. बावस्कर समोर आले तर या माणसामध्ये असामान्य संशोधक दडला आहे, हे जाणवतदेखील नाही. जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील देहेड या खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी लाकूडतोड, हॉटेलात कपबशा धुणे यांसह अनेक प्रकारचे कष्ट करून शालेय शिक्षण पूर्ण केले. इंटर सायन्समधील यशानंतर त्यांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या शिक्षणात प्रा. के. डी. शर्मा यांनी दिलेला ‘पॅथॉलॉजी इज द मदर ऑफ मेडिकल सायन्स’ हा गुरुमंत्र हिम्मतराव कोळून प्यायले. रोगाच्या मुळाशी जाऊन नोंदींच्या दस्ताऐजीकरणावर त्यांनी भर दिला. कोकणात विंचू व सर्पदंशामुळे अनेक निष्पापांचे जीव जात असल्याचे पाहून डॉ. बावस्कर यांना स्वस्थ बसवेना आणि त्यांनी सर्प व विंचूदंशामुळे होणार्‍या मृत्यूच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात 1976च्या सुमारास डॉक्टरांची नियुक्ती झाली. तेव्हापासून सरकारी दवाखान्यातील सेवेचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. खाजगी किंवा पैसे घेऊन सेवेला थारा दिला नाही. या भागात विंचूदंशामुळे लोक दगावताहेत, हे समजल्यावर त्यांनी त्यांची कारणे, त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला. डोळ्यादेखत हृदय पिळवटून टाकणारे मृत्यू ते पाहत होते. 1976-77 या काळातील 20 केसेसचा अहवाल त्यांनी तयार केला व तो हाफकिन, जेजे येथील तज्ज्ञांना दाखवला. डॉ हिम्मतराव बावस्करांच्या नोंदींच्या पुराव्यासह 1978 मध्ये सर्वप्रथम ‘लॅन्सेट’ या लंडनच्या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात एक अहवाल प्रसिद्ध तर झाला, परंतु त्यात डॉ. बावस्करांना तिसरे स्थान होते. त्यानंतर मात्र त्यांनी विंचूदंशाच्या 51 प्रकरणांचा अभ्यास करून स्वतः शोधनिबंध तयार केला. लॅन्सेटने तो प्रकाशित केला. नंतर औंध येथे राहून त्यांनी एमडी केले व त्यादरम्यान विंचूदंशाची पार्श्वभूमी डोळ्यापुढे ठेवून वैद्यकीय संदर्भग्रंथांचे वाचन केले. विंचूदंशावर परिणामकारक औषध कोणते, यावर त्यांनी विचार केला. सोडिअम नायट्रोप्रूसाइडचे द्रव्य इंजेक्शनद्वारे प्रभावी ठरेल, असे त्यांनी निश्चित केले. दरम्यान, डॉ. प्रमोदिनी यांच्याशी विवाहबद्ध होऊन डॉ. बावस्कर दाम्पत्य पोलादपूर येथे 1982मध्ये रुग्णसेवेत रुजू झाले. त्याच काळात प्रथम आठ वर्षांच्या रुग्णाला विंचूदंशावर हे इंजेक्शन लागू पडले, मात्र ते प्राथमिक आरोग्य केंद्रात देणे जोखमीचे होते. तेव्हा याला पर्याय म्हणून तोंडावाटे घ्यावयाच्या प्राझोसीन या औषधाच्या वापराचा शोध त्यांना लागला. हा उपचार प्रभावी ठरल्याचा डॉ. हिम्मतरावांचा प्रबंध 1986 साली लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला. पुण्याहून आणलेले सोडिअम नायट्रोप्रुसाइड हे इंजेक्शन आणि डॉ. बावस्कर पती-पत्नींनी डोळ्यात तेल घालून रात्रभर त्या मुलावर केलेले उपचार यातून एक पथदर्शी यश हाती आले. जन्मदात्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही ते या वेळी जाऊ शकले नव्हते. नांदवीच्या या मुलाच्या रूपाने पोलादपूरच्या प्राथमिक केंद्रात हिम्मतरावांच्या आमूलाग्र संशोधनाची नांदी झाली होती. या उपचारांची महत्ता इतकी की कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दूचेरी, गुजरात या भागातील विंचूदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांवरून एक टक्क्याखाली आले. 1993 मध्ये याच संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी सीबा फाउंडेशनने हिम्मतरावांना लंडनमध्ये निमंत्रित केले. 2011मध्ये प्राझोसिन आणि प्रतिलस यांच्या परिणामकारकतेविषयी त्यांचा प्रबंध ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला. फुरसे, कांबळ्या, मण्यार, कोब्रा (नाग) या विषारी सापांच्या दंशातून होणारा वेगवेगळा परिणाम व त्यावरची स्वतंत्र उपचारपद्धती याचा त्यांनी अभ्यास केला. सर्पदंशावरील प्रतिलस कशी द्यावी, कोणते औषध देऊ नये, याचे मार्गदर्शन केले. त्याविषयी ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’च्या जर्नलमध्ये त्यांचा प्रबंधही प्रकाशित झाला. डॉ. हिम्मतराव बावस्करांचे संशोधन विंचू व सर्पदंशापुरते मर्यादित राहिले नाही. बुलढाणा व अकोला जिल्ह्यात रासायनिक खतांमुळे जलस्त्रोतांमध्ये कॅडमिअम व शिसे यांचा संसर्ग होऊन शेतकर्‍यांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचा गंभीर आजार दिसून येत होता, हा निष्कर्ष त्यांनी क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी या प्रबंधात मांडला. कूपनलिकांमधील पाण्यामध्ये फ्लुरॉइडचा अंश असल्याने दाताला फ्लुरॉसिसचा आजार जडत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. हायपोथॉयराइड हे अनेकविध आजारांच्या मुळाशी कसे असते, हे त्यांनी सांगितले. या डॉक्टर दाम्पत्याने असे 108 शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले. स्मृतिभ्रंशाच्या आजाराचे वेळेत निदान करण्यासंबंधी त्यांनी संशोधन केले. कानाला पडलेल्या भेगा हे हृदयरोगाचे लक्षण असते, हे त्यांनी 888 रुग्णांच्या तपासणीनंतर अनुमान काढले. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारी बी12 जीवनसत्त्वाची कमतरता याविषयी त्यांनी मौलिक विवेचन केले. पेट्रोल पंप, गॅरेज कामगार, सुरमा वापरणारे यांच्या शरीरात शिशाचा अंश जास्त झाल्याने होणारे परिणाम त्यांनी दाखवून दिले. डॉ. हिम्मतराव बावस्करांनी त्यांचे सर्व संशोधन स्वतःच्या अर्थबळावर केले. सरकारी सेवेत रुग्णाकडून कधी पैसा घेतला नाही, उलट त्यांनाच पैसे दिले. प्रसंगी 24 तास रुग्णाबरोबर जागून काढले. काही वर्षांपूर्वी हिम्मतरावांना एका पॅथॉलॉजी प्रयोगशाळेकडून रुग्ण पाठवल्याबद्दलचा हिस्सा म्हणून एक धनादेश आला. या लॅबने डॉक्टरचे नाव वाचले नसावे. हिम्मतरावांनी हे प्रकरण मेडिकल कौन्सिलपर्यंत नेले व कट प्रॅक्टिसवर हल्ला चढवला. ‘पुरस्कार मिळाला, तर एक माणूस मोठा होईल, पण आपल्याला अनेक माणसे मोठी करायची आहेत,’ असे डॉ. बावस्कर म्हणतात. ‘दहा दिवसांनी रुग्ण आपल्या पायावर चालत येतो, या इतका मोठा पुरस्कार नाही, रुग्ण हेच माझे दैवत,’ असे डॉ. हिम्मतराव बावस्कर आजही मनोभावे सांगतात. डॉ. बावस्कर यांच्या रूपाने एक रत्न लाभले असून त्यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा समस्त महाडकरांचा गौरव आहे.

-महेश शिंदे

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply