मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तरी सभागृहाची मंजुरी मिळाल्यावर तो निर्णय प्रत्यक्ष अमलात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्यासाठी दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करीत आमदार प्रसाद लाड यांनी भाजपचे 12 आमदारांचे निलंबन मागे घेऊन अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घ्या, असे आवाहन ट्विटरद्वारे त्यांनी ठाकरे सरकारला केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील 60 वर्षांचे नियम डावलून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो राज्याच्या हिताचा नसून, हा नुकसानीचा निर्णय असल्याचे म्हणत, स्वतःचे बहुमत आहे म्हणून वाट्टेल तो निर्णय घ्यायचा हा अधिकार यांना कोणी दिलेला नाही तेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पळपुटेपणाचे हे लक्षण महाविकास आघाडीकडून होत असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, त्यांना माहीत आहे की, त्यांचा अध्यक्ष निवडून येऊ शकत नाही. मते फुटू शकतात. म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझे त्यांना स्पष्ट आवाहन आहे की, महाविकास आघाडीला जर हिंमत असेल तर आमच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे आणि आवाजी मतदान न करता गुप्त मतदान करून निवडणूक घ्यावी. असे सांगताना त्यांनी 100 टक्के महाविकास आघाडीचा अध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही पाडू आणि भाजपचा आघाडीचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येईल हे मी खात्रीलायक आपल्याला सांगू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.