नवी मुंबई : प्रतिनिधी
सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे विविध प्रकारच्या मालमत्तांच्या हस्तांतरणाकरिता आकारण्यात येणारे शुल्क दर 1 एप्रिल, 2019 ते 31 मार्च, 2022 या कालावधीकरिता निश्चित करण्यात आले आहेत. त्यास सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या ठरावामध्ये आधीच्या वर्षीचा दर लक्षात घेऊन पुढील वर्षासाठी हस्तांतरण शुल्क दर ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.उपरोक्त ठरावानुसार 01 एप्रिल 2019पासून सुरू होणार्या आर्थिक वर्षासाठीचा हस्तांतरण शुल्क दर ठरविला असून निवासी तथा वाणिज्यिक व केवळ वाणिज्यिक वापराकरिता वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांकरिता हस्तांतरण शुल्काची नव्याने रचना (स्लॅब) करून लहान भूखंडधारकांना दिलासा देण्यात आला आहे. हस्तांतरण शुल्काच्या नवीन रचनेनुसार एसएस टाईप युनिटसह 30 चौमीपेक्षा कमी चटई क्षेत्रफळ असणार्या सदनिकांसाठी 5 टक्के, तर उर्वरित सर्व सदनिका, दुकाने/ऑफिस आणि भूखंडांसाठी 10 टक्के या दराने हस्तांतरण शुल्कात वाढ करण्यात आली आहे.