पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप व मित्रपक्ष शिवसेनेने चांगले यश प्राप्त केले आहे. श्रीवर्धन तालुक्यात दांडा, मारळ, काळींजे, वेळास या चार ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला. उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीतही ‘कमळ’ फुलले; तर पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेना युतीची सरशी झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 25) जाहीर झाला. या वेळी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ, कर्नाळा व चिपळे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत युतीने घवघवीत यश संपादन केले आहे. कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये युतीचे सदाशिव रामदास वास्कर थेट सरपंचपदी विजयी झाले असून, सदस्यपदी संगीता रमण वास्कर, विनोद विजय भोईर, दिलीप धावू वास्कर, जागृती संदीप वास्कर, करिष्मा सुनंदा पाटील व दत्ता मिन्नाथ पाटील निवडून आले आहेत.
कर्नाळा ग्रामपंचायतीत युतीने शेकापला भगदाड पाडले. या ग्रामपंचायतीवर शेकापची गेली 25 वर्षे एकहाती सत्ता होती. येथे युतीने 13पैकी 7 जागा जिंकत शेकापला जोरदार दणका दिला असून, युतीचा उपसरपंच होणार आहे. या ग्रामपंचायतीत सुरेश बारक्या हापसे, सुनीता विष्णू वाघमारे, तुळसा सुरेश हापसे, हसुराम गणपत पाटील, रत्नमाला राजेंद्र म्हात्रे, राम बापूराव सावरा, जगदिश पांडुरंग जंगम विजयी झाले; तर चिपळे ग्रामपंचायतीत युतीचे मंगेश पंढरीनाथ फडके, मीनाक्षी राजेंद्र फडके, रंजना रमेश पाटील, जयश्री गणेश म्हसकर व ज्ञानेश्वर फडके विजयी झालेत.
विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.