Breaking News

रायगडात महाविकास आघाडीत बिघाडी

जि. प.च्या सत्तेत सहभागी न होण्याचा शिवसेनेचा निर्णय

अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात मोठा गाजावाजा करून तयार झालेल्या आणि राज्य सरकार स्थापन करणार्‍या महाविकास आघाडीचे रायगड जिल्ह्यात मात्र तीनतेरा वाजले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बुधवारी (दि. 15) बिनविरोध झाली, मात्र शिवसेना सदस्यांनी या सभेस गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रायगडात महाआघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या चार सभापतींची निवड करण्यासाठी कै. प्रभाकर पाटील सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील ही आघाडी होत आहे, परंतु रायगडात शिवसेनेला पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने जि. प.च्या सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारच्या सभेस शिवसेनेच्या सदस्यांनी गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली.
या विशेष सभेत महिला व बालकल्याण सभपतिपदासाठी राष्ट्रवादीच्या गीता जाधव, तर समाजकल्याण सभापतिपदासाठी शेकापचे दिलीप भोईर यांनी अर्ज भरला. त्याचप्रमाणे सभापती क्र. 1साठी शेकापच्या अ‍ॅड. नीलिमा पाटील यांनी आणि सभापती क्र. 2साठी राष्ट्रवादीचे बबन मनवे यांनी अर्ज भरला होता. चारही सभापतिपदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले.
दरम्यान, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण या विषय समित्यांच्या सभापतींची निवड विषेश सभेत थेट केली जाते. त्यानुसार अनुक्रमे गीता जाधव व दिलीप भोईर यांची निवड बुधवारी करण्यात आली. उर्वरित सभापती क्र. 1 अ‍ॅड नीलिमा पाटील, क्र. 2 बबन मनवे, तसेच उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे खातेवाटप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे, मात्र शिवसेनेने यातून अंग काढून घेतल्याने महाविकास आघाडीला जिल्ह्यात धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply