केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची माहिती
डोंबिवली : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेला ठराव मंजुरीसाठी आता अंतिम टप्प्यात आहे. विमानतळाचे काम पूर्ण होताच केंद्राकडून तो मंजूर करून विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.
आगरी युथ फोरमने डोंबिवली येथे आयोजित केलेल्या 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विषयावर पत्रकार अनिकेत घमेंडी यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष आणि विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की, दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे यासाठी उभारलेल्या लढ्यामुळे आपला सारा आगरी समाज एक झाला आणि त्यांनी लाखोंच्या संख्येने दिलेल्या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली हा या लढ्याचा मोठा विजय आहे. राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला ठराव आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची आपल्याला गरज भासणार नाही.
एका प्रश्नाच्या उत्तरात ना. पाटील म्हणाले की, ज्यांना याची शाश्वती नसेल त्यांना मी माझ्या खर्चाने दिल्लीला नेतो व त्यांनी संबंधितांकडून माहितीची खात्री करून घ्यावी तसेच हा नावाचा प्रश्न निवडणुकीपूर्वी सुटला तर बरेच होईल, पण ते विमानतळाच्या कामावर अवलंबून आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आगरी भाषेविषयी बोलताना ना. पाटील यांनी सांगितले की, इतर समाजातील नागरिक समाज घटकांबरोबर बोलताना आपल्या मातृभाषेत बोलतात, पण अनेक आगरी बांधवांना आगरी भाषेत बोलायची लाज वाटते. आपण आपल्या भाषेला प्राधान्य न दिल्यास आपली आगरी भाषा लोप पावेल.
नवी दिल्ली येथील विमानतळावर एका केंद्रीय मंत्र्याबरोबर भाषा विषयावर चर्चा करीत असताना त्यांनी माझी मातृभाषा विचारली. मी मराठी सांगितली.त्यांनी पूर्वी आधी घरातील भाषा विचारली. मी आगरी बोललो. त्यावर ते म्हणाले, ही भाषा घरात सर्वांना येते का? नव्या पिढीला ती येत नसल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले की अशा पद्धतीने आपली भाषा लोप पावते.
खरी आगरी भाषा गावागावात ब़ोलली जाते. तिचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आपली भाषा बोलली पाहिजे, असेही ना. पाटील यांनी आवर्जून सांगितले.
प्रारंभी दशरथ पाटील यांनी दि.बा.पाटील यांचा जीवनप्रवास कथन करून त्यांच्या कार्याची माहिती दिली.