जबलपूर : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील एमएलबी क्रीडांगणावर सुरू असलेल्या 54व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांपुढे यंदा जेतेपदाच्या मार्गावर परतण्याचे कठीण आव्हान असेल, मात्र रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण या संघांकडून मिळणार्या कडव्या झुंजीसह जबलपूरमधील वाढती थंडी आणि करोनाचाही खो-खोपटूंना मुकाबला करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून तेथे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याशिवाय वाढत्या थंडीमुळे स्पर्धेच्या आयोजनावर, तसेच खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी द्यावी की नाही, यासंबंधी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सर्व खेळाडू तसेच पदाधिकार्यांना दोन चाचण्यांचे प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर चाचणीचा निकाल सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. सलग तिसर्या वर्षी बिपीन पाटील पुरुषांना, तर महेश पालांडे महिलांना मार्गदर्शन करतील. 2019-20मध्ये झालेल्या अखेरच्या राष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांमध्ये रेल्वेने, महिलांमध्ये विमानतळ प्राधिकरणाने महाराष्ट्राची मक्तेदारी संपुष्टात आणली होती. पुरुषांच्या ब-गटात महाराष्ट्राची नागालँडशी सलामीची लढत होईल. या गटात तेलंगणा, हरयाणा, हिमाचल प्रदेश यांचाही समावेश आहे. महिलांच्या ब-गटातसुद्धा महाराष्ट्राची पहिल्या सामन्यात नागालँडशीच गाठ पडेल. महाराष्ट्राच्या महिलांना साखळीत विदर्भ, मध्य भारत, अंदमान-निकोबार या संघांनाही सामोरे जावे लागणार आहे. याव्यतिरिक्त रेल्वे, कोल्हापूर, विदर्भ या संघांच्या कामगिरीकडेही महाराष्ट्रातील खो-खो चाहत्यांचे आवर्जून लक्ष असेल.