Breaking News

उरणच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुविधांचा अभाव

वनविभागाकडून विकासात अडथळा; स्थानिकांचा आरोप

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण होत आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, बिपीसीएल असे अनेक प्रकल्प तालुक्यात असूनही उरणच्या आदिवासी वाड्या अविकसित असल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतर दिसून येत आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे रस्ता असताना शासनाच्या वनविभागाकडूनच विकासासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले जात आहे.

उरणचे दोन भाग आहेत एक आहे पश्चिम आणि दुसरे आहे पूर्व.पूर्व भाग हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात आहे. या भागामध्ये डोंगर भागात आदिवासी वाड्या वसलेल्या आहे. पुनाडेपासून ते जांभुळपाडा रानसई परिसरात आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत.आदिवासी वाड्यामधील रानसई ग्रामपंचायत परिसरामध्ये सहा आदिवासी ठाकूर वाड्या आहेत. खैरकाठी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खोंड्याची वाडी, भुर्‍याची वाडी, साधारणपणे सहा वाड्यामध्ये 1276 लोकसंख्या आहे. त्यामधील 825पेक्षा जास्त मतदान आहे. वाड्यामध्ये विकासाच्या नावांनी बोंबाबोंब आहे.

रस्ते झालेले नाहीत ह्या वाड्यांपर्यंत जाण्यासाठी पनवेल तालुक्यातून रस्ता आहे आणि उरणच्या टाकीगाव येथून ही रस्ता आहे. शासनाच्या मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता मंजूर आहे, परंतु वनविभागाच्या खोड्यामुळे फक्त खडीकरण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजीपाला लावून उदर निर्वाह चालविला जातो, परंतु वाहतूकीसाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.

खरे पाहता रानसई धरण हा या वाड्यांच्या उशाशी आहे, पण आदिवासी बांधवांच्या कोरड घशाशी आहे. प्रत्येक वाडीमध्ये विहीर आहे, परंतु ह्यांचे पाणी शेवटपर्यंत शिल्लक राहत नाही.

सोलरद्वारे पाणी ही विहिरीतून पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यत पोचविले गेले होते, परंतु विहरीतच पाणी शिल्लक राहत नसल्याने ते असूनही नसल्यासारखे आहे. त्यामुळे पाण्यावाचून वणवण भडकावे लागत आहे. हेटवणे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी मिळावा या साठी नागरिकांकडून मागणी होत आहे.

चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाच वाड्या आहेत त्यामधील  केलाचा माळ ही एक वाडी आहे. साधारणपणे 45 कुटुंब या वाडीमध्ये वास्तव्य करीत आहेत 175 लोकसंख्या असून 125 मतदान आहे. या वाडीसाठी जाण्यासाठी रस्ता मंजूर होऊनही पूर्णत्वास येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पायपीट करून जावे  लागते  पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना वणवण भडकावे लागत आहे. बोरींग आहे, तर त्याला पाणी नाही. विहीर आहे, तर त्या विहिरीला पाणी पुरत नाही. उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी मागवावे लागते. लाईट वाचून त्यांना चार चार दिवस राहावे लागत आहे. पाणी लवकर मिळावा आणि रस्ता लवकर बनविण्यात यावा, अशी येथील आदिवासी नागरिकांची मागणी आहे.

चिरनेरच्या चांडायली आदिवासी वाडीवर तर लाईटच नाही. पाणी, शिक्षण रस्ते असे अनेक प्रश्न शिल्लक राहिले आहे. हाताला काम मिळत नसल्याने घरखर्च कसा चालवावा हा ही प्रश्न निर्माण होत आहे. उरणचा विकास झपाट्याने होतोय, शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील आदिवासी जनतेला मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत असल्याची मोठी शोकांतिका आहे.

आमच्या वाडीत लाईट आम्हाला कधीच बघायला मिळाली नाही. वाडीवर शाळाही नाही. पाणी वर्षानुवर्षे विहिरीचे प्यावे लागत आहे. जर आम्हाला या काही महिन्यात या सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही यापुढे वाडीतील एकही व्यक्ती मतदान करणार नाही. -भरत कातकरी, चांडायली वाडी अध्यक्ष

कोणत्याही विकासासाठी रस्ते होणे गरजेचे आहे. ह्या वाड्यावर येण्यासाठी रस्ते मंजूर आहेत, परंतु वनविभागाच्या खोड्यामुळे हे राहिले आहे. आणि पाण्याचा ही मोठी समस्या आहे. ती पूर्ण झाली पाहिजे. -व्ही. आर. म्हात्रे, ग्रामसेवक, रानसई ग्रामपंचायत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply