प्रशासकीय मान्यता; शिंदेंच्या गतिमान सरकारने जिंकली जनतेची मने
पाली : प्रतिनिधी
देश स्वातंत्र झाल्यापासून बेणसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंबा नदी खाडीवरील अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त असलेल्या पुलाचे स्वप्न आता प्रत्येक्षात सत्यात उतरणार आहे. या पुलासाठी तब्बल 35 कोटीच्या भरीव निधीची मंजुरी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बजेटमध्ये नमूद केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अवघ्या काही महिन्यातच शिंदे सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे शिंदेंच्या गतिमान सरकारने जनहितार्थ विकासकामांना प्रथम प्राधान्य देत जनतेची मने जिंकली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणसे, झोतिरपाडा, मुंढाणी, शिहू आणि कुहिरे या पाच ग्रामपंचायती आंबा नदी आणि खाडीमुळे 75 वर्षांपासून दुर्गम बनल्या आहेत. तालुक्याचे ठिकाण आणि मुख्य रस्त्याला जोडणारा पुल व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे यांनी आंदोलनात्मक भूमिका घेत आंबा नदीवर दि.(24) जानेवारी रोजी उपोषण केले होते. पेण तालुक्यातील शिहू बेणसे ते रा.म.मा. 17 कडे जाणारा रस्ता हा रस्ते विकास योजना सन 2001-2021 अन्वये इ.जि.मा. 52 चा भाग आहे. या रस्त्यावरून रा.म.मा. 17 कडे जाण्यासाठी अंबा नदी ओलांडून जावे लागते. सद्यःस्थितीत या ठिकाणी पूल नसल्याने या भागातील ग्रामस्थांना तसेच औषधोपचार घेणार्यांना व विद्यार्थी कर्मचार्यांना वळसा घालून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. सदर पूलाचा फायदा शिहू, बेणसे, झोतीरपाडा, मुंढाणी, कुहीरे या गावांना व जवळपासच्या आदिवासी वाड्यांना असे 19000 ते 20000 लोकसंख्या असणार्या जनतेला होणार आहे.तरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 से राज्य मार्ग 87 राजारा बेणसे ते कोलेटी रस्त्यावरील आंबा नदीवरील पुल च.ड.ठ.ऊ. उ अंतर्गत तयार करणे करिता शासनामार्फत प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी आ.महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणी ला पुरेपुर न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एकेकाळी व्यापार विनिमय व दळणवळण यासाठी प्रसिद्ध असलेले बेणसे बंदर कालांतराने दुर्लक्षित होत गेले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून बेणसे आंबा नदी खाडी हाकेच्या अंतरावर आहे. मुख्य रस्त्यापासुन केवळ दिड किलो मिटर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पेण शहरापासुन केवळ 12 किलो मिटर लांब असलेल्या या पाच ग्राम पंचायतीतील ग्रामस्थांमध्ये आंबा नदी आणि खाडी असल्याने 40 किलो मिटर इतके अंतर पार करावे लागते. यासाठी बेणसे ते कोलेटे दरम्यान आंबा नदीवर पुल बांधावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत होते. आज अखेर ग्रामस्थांच्या या मागणीला यश आले असून पुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय. लवकरच बेणसे आंबा नदीवर पूल उभारला जाईल व पंचक्रोशीतील 19 हजार हुन अधिक नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होणार असल्याने नागरिक जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. सदर पूल निर्माणासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करणारे उद्धव कुथे, त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ व आमदार महेंद्र दळवी यांचे जनतेतून आभार मानले जात आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांची मध्यस्थी यशस्वी
यावेळी आ. महेंद्र दळवी यांच्या यशस्वी मध्यस्थीने संबंधित प्रशासनाने उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनतर उपोषण स्थगित केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेटमध्ये रा.म.मा.66 ते रा.मा.87 रस्त्याला जोडणारा बेणसे शेतजुई ते बेणसे बंदर ते कोलेटी रस्त्यावरील अंबा नदीवर मोठया पुलाचे पोचमार्ग व भूसंपादनासह बांधकाम करण्यासाठी ग्रा. मा 3 ता. पेण जिल्हा- रायगड ,आंबा नदी खाडीवरील पुलासाठी तब्बल 35 कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे व शेकडो ग्रामस्थांनी उभारलेले आंदोलन व सातत्याने या मागणीसाठी केलेला पाठपुरावा याचीच फलश्रुती होऊन या कामी शिंदे सरकारने भरभरून निधी देऊन होय, आमचे गतिमान सरकार असल्याचे सिद्ध केले आहे.
बेणसे आंबा नदी खाडीवर पूल उभारला जावा अशी विभागातील ग्रामस्थांनी 50 वर्षापासून मागणी लावून धरली होती. शिंदे सरकारने सदर पुलाला वर्षभरातच मंजुरी दिली. पाच ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या 19 हजार लोकसंख्येच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या पुलासाठी प्रशासन दरबारी सातत्याने आम्ही पाठपुरावा सुरू होता. आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून अखेर पुलाची स्वप्नपूर्ती होत आहे. या पुलाच्या कामासाठी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 35 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून लवकरच पुलाचे स्वप्न साकारले जात आहे. त्यामुळे या विभागातील जनता आनंदित असून या विकासकामाबद्दल शिंदे फडणविस सरकार यांचे खूप खूप आभार मानतो व धन्यवाद देतो.
-उद्धव कुथे, सामाजीक कार्यकर्ते