चौक : रामप्रहर वृत्त
विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर शाळेच्या एसएससी परीक्षेमध्ये प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाला. परीक्षेला सामोरे जात असताना आपल्या ध्येयापासून जराही विचलित होऊ नका. जोमाने अभ्यास करा. यश तुमचेच आहे. आमच्या कंपनीकडून आपणास नेहमीच सहकार्य मिळेल, असे आश्वासन देऊन, बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर दिनेश चंद्रसिंग यांनी या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य बादशा भोमले यांनी प्रास्ताविक केले. आपली क्षमता व आवड लक्षात घेऊन भविष्याची वाटचाल करा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील, असे सांगून योगेंद्र शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका पूनम दळवी, शिक्षक रमेश गायकवाड, सतीश बांबळे, मुकुंद वरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाला दिला तसेच शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बिर्ला कार्बन कंपनीच्या वतीने यावेळी 175 विद्यार्थ्यांना हेल्थ किट (गुड नाईट कॉम्बो, कोलगेट, ब्रश, सॅनिटायझर, मास्क, डेटॉल साबण) एक्झाम पॅड, कंपास पेटी इत्यादी वस्तुंचे वितरण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख, बिर्ला कार्बन कंपनीचे सीएसआर प्रमुख लक्ष्मण मोरे, उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मोळीक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली. शरद कुंभार यांनी आभार मानले.