कर्जत : बातमीदार
तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील चौधरवाडीमध्ये बैलांच्या झोंबीत चार विजेचे खांब कोसळले होते. स्थानिकांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर महावितरणला जाग आली. त्यांनी नवीन विजेचे खांब उभे केल्यानंतर तब्बल चार दिवसाने चौधरवाडीमधील अंधार दूर झाला. चौधरवाडीमध्ये 65 घरांची वस्ती आहे. या आदिवासी वस्तीमध्ये 30 वर्षांपूर्वी विजेचे लोखंडी खांब टाकण्यात आले आहेत. त्यातील बहुतेक खांबांना गंज लागल्याने ते सडलेले आहेत. त्याबाबत तत्कालीन उपसरपंच विलास भला यांनी महावितरणकडे नवीन खांब बसविण्याची मागणी केली होती. मात्र हे खांब बदलण्यात येत नव्हते. 26 डिसेंबरच्या रात्री काही मोकाट बैलांत झोंबी झाली. ती गावातील सडलेल्या विजेच्या खांबाला धडकली. त्यावेळी बैलांच्या धडकेत चक्क विजेचे चार खांब कोसळले आणि चौधरवाडीचा वीजपुरवठा बंद झाला. स्थानिकांनी त्याबाबत महावितरणकडे तक्रारी केल्या, मात्र तीन दिवस महावितरणचा कर्मचारी चौधरवाड मध्ये पोहचला नाही. शेवटी गुरुवारी (दि. 30) महावितरणचे कडाव येथील शाखा अभियंता विजेचे नवीन खांब घेऊन चौधरवाडीमध्ये पोहचले आणि तब्बल चार दिवसानंतर चौरवाडीचा वीज पुरवठा सुरू झाला.