पाच लाख 34 हजार 700 रुपयांचा दंड वसूल
पनवेल : प्रतिनिधी
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांबरोबरच विनामास्क फिरणार्या आणि रात्री 9 नंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान चारही प्रभागांमधून गेल्या तीन दिवसांमध्ये पाच लाख 34 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाबरोबर आयुक्त गणेश देशमुख स्वतः रस्त्यावर उतरले होते.
राज्यासह पालिका क्षेत्रात कोराना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासनाने पुन्हा कठोर निर्बंध लागू गेले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम मर्यादित प्रमाणात करण्याच्या सूचना आयुक्तांनी 29 डिसेंबरला झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. सध्या ओमायक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या, तसेच राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार विवाह सोहळ्याबरोबरच कोणत्याही सभारंभात फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
नववर्षानिमित्त हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांमध्ये करोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 50 अधिकारी, कर्मचार्यांची भरारी पथके गेल्या दोन-तीन दिवसापासून तैनात करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जात आहे.
हुल्लडबाजी करणार्यांवर या पथकाची करडी नजर ठेवून होते. शहरातील मोकळ्या जागी, तसेच सार्वजनिक ठिकाणीही या पथकांमार्फत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर प्रमुख ठिकाणांसह बाजारपेठ परिसरात रात्री 9 वाजेनंतर गर्दी होणार नाही याची दक्षता पालिकेच्या भरारी पथकाने घेतली. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही प्रभागात आयुक्तांनी स्वतः जाऊन दंडात्मक कारवाई केली.