Breaking News

आपला देश धर्मशाळा नाही : गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नागरिकत्व कायदा देशातील नागरिकांच्या विरोधातील नाही. त्यामुळे देशातील जनतेला कुणीही भडकवू नये. विदेशी नागरिकांना आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहण्याची मुभा द्यायला आपला देश म्हणजे धर्मशाळा नाही. कोणताही देश अशा घुसखोरांना कधीच थारा देऊच शकत नाही, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्याला बेगडी विरोध करणार्‍यांना सुनावले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केले. आसाममध्ये एनआरसीच्या यादीत ज्यांचे नाव आले नाही, त्यांच्याकडे कायदेशीर पर्याय आहेत. आसाममध्ये सातत्याने मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावरून बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या भारतात घुसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस आणि ओवेसींसारख्या नेत्यांना या बेकायदेशीर घुसखोरांना भारताचे नागरिकत्व द्यायचे आहे का, असा सवालही गडकरी यांनी केला.

आसाममध्ये बांगलादेशींची घुसखोरी झाली आहे. या नागरिकांना अधिकारही देण्यात आले आहेत. अशा लोकांविरोधात काही कायदा असू नये का? ज्या अल्पसंख्याकांचा पाकिस्तान आणि बांगलादेशात छळ झालाय त्यांनाच नागरिकत्व दिले जात आहे. त्यात कोणत्याही भारतीयाचे नुकसान नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

भाजप अल्पसंख्याकांविरोधात नाही. काही राजकीय पक्षच तशी भीती निर्माण करीत आहेत. या लोकांना देशातील वातावरण खराब करायचे असून देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांनी अशा राजकीय पक्षांपासून सावध राहावे. नागरिकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुसलमानाचे नुकसान होणार नाही. आमचे ऐका, देशातील परिस्थिती पूर्ववत होईल. जगातील कोणताही देश घुसखोरांना मतदानाचा अधिकार देऊ शकतो का, असा सवाल करतानाच आपल्या देशात मात्र बांगलादेशातून आलेल्या लोकांनी पक्षही स्थापन केला असून त्यांचे आमदार आणि खासदारही निवडून आले आहेत, याकडेही केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply